आयआयटी, आयआयएम आणि विद्यापीठांच्या संख्येत गत नऊ वर्षांत तिपटीने वाढ | पुढारी

आयआयटी, आयआयएम आणि विद्यापीठांच्या संख्येत गत नऊ वर्षांत तिपटीने वाढ

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली :  जास्तीत जास्त युवकांना दर्जेदार तसेच उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी, यादृष्टीने देशातील विद्यापीठे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [आयआयएम] आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलाॅजी [आयआयटी] यांच्या संख्येत वाढ केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून गत 9 वर्षांच्या कालावधीत अशा शिक्षण संस्थांच्या संख्येत तीनपटीने वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून शुक्रवारी सांगण्यात आले.

वर्ष 2014 मध्ये देशातील विद्यापीठांची एकूण संख्या 320 इतकी होती. वर्ष 2023 मध्ये ही संख्या वाढून 1113 इतकी झाली आहे. आयआयटीचा विचार केला तर वर्ष 2014 मध्ये असलेली 7 आयआयटींची संख्या वाढून 23 वर गेली आहे. तर आयआयएमची संख्या 7 वरुन 20 वर गेली आहे. 2014 साली महाविद्यालयांची एकूण संख्या 38 हजार 498 इतकी होती. ती आता वाढून 43 हजार 796 वर गेली आहे. महाविद्यालयांच्या संख्येत झालेली वाढ 5 हजार 298 इतकी आहे. विशेष म्हणजे 43 टक्के विद्यापीठे आणि 61.4 टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत.

गत 9 वर्षांच्या कालावधीत 16 नवीन आयआयटी तसेच 13 नवीन आयआयएमची स्थापना झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची कवाडे खुली झाली आहेत. यापुढील काळातही उच्च शिक्षण संस्थांचा विस्तार केला जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button