नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अवमाननेचा गुन्हा सिध्द झालेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शिक्षेवर पुनर्विचार करण्याच्या विनंतीची याचिका सुरतच्या न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. यावर भाजपने 'ही गांधी कुटुंबियाला बसलेली चपराक आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुरत न्यायालयाचा निकाल म्हणजे ओबीसी समाजाचा तसेच देशवासियांचा विजय असल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशात एखाद्या कुटुंबाचे नव्हे तर कायद्याचे राज्य असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. कोणाही कुटुंबाला वेगळ्या सवलतीची मुभा दिली जाऊ शकत नाही, हेही यामुळे सिध्द झाले आहे, असे सांगून पात्रा पात्रा पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि लांगुलचालन हे पर्यायवाचक शब्द बनले आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका होत असलेल्या कर्नाटकच्या जनतेबरोबर देशवासियांनाही हे पुरेपूर माहित आहे. समाजातील मागास वर्गाला उद्देशून राहुल गांधी यांनी आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. आपण असे करु आणि त्यातून निभावून जाऊ, असा राहुल गांधी यांचा होरा होता. तथापि तसे होऊ शकलेले नाही. न्यायालयाने गांधी कुटुंबाच्या तोंडावर चपराक मारली आहे. कायदा सर्वांसाठी एकच असल्याचे सुरत न्यायालयाने स्पष्ट केले आहे.