इंडियन स्पेस असोसिएशन : पीएम मोदींच्या हस्ते होणार सुरुवात | पुढारी

इंडियन स्पेस असोसिएशन : पीएम मोदींच्या हस्ते होणार सुरुवात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

अवकाश आणि सॅटेलाईट कंपन्यांनी एकत्रित येऊन इंडियन स्पेस असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी या असोसिएशनचे लाँचिंग केले जाणार आहे.

अवकाश आणि सॅटेलाईट क्षेत्राचा अतिशय झपाट्याने विकास होत असून या क्षेत्रातील देशातंर्गत तसेच विदेशी कंपन्या आगामी काळात एकत्रितपणे येऊन काम करणार आहेत.

असोसिएशनचे संस्थापक सदस्य असलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, टाटा उद्योगसमुहाचा भाग असलेली नेल्को, वनवेब, मॅपमाय इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज, अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे. याशिवाय असोसिएशनमध्ये गोदरेज, ह्युजेस इंडिया, एझिस्टा-बीएसटी एरोस्पेस लिमिटेड, बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.

अवकाश आणि सॅटेलाईट क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून विविध क्षेत्रांच्या उन्नतीमध्ये हे क्षेत्र सकस भागीदारी करेल, असा विश्‍वास असोसिएशनचे महासंचालक ए. के. भट्ट यांनी व्यक्‍त केला. असोसिएशनचे पहिले अध्यक्ष म्हणून एल अँड टी एनएक्सटीचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भारती एअरटेलचे मुख्य नियामक अधिकारी राहुल वत्स हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.

हे ही वाचलं का ?

 

Back to top button