

नवी दिल्ली, ११ एप्रिल, पुढारी वृत्तसेवा, Vibrant Villages Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना, विशेषतः तरुणांना देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना भेट देण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी या संदर्भात ट्विट करताना पंतप्रधान म्हणाले, यामुळे युवा वर्गाची विविध संस्कृतींशी ओळख होईल तसेच त्यांना सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
अमृत महोत्सव उपक्रमातर्फे चालवण्यात येत असलेल्या ट्विटर वरुन 'चैतन्यमयी गावे' कार्यक्रमाअंतर्गत Vibrant Villages Program ओडिशातील काही तरुण सध्या किबीथू आणि तुतिंग या गावांना भेट देत आहेत.चैतन्यमयी गावे कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना ईशान्य भागातील काही गावांना भेटी देऊन तेथील जीवनशैली,जमाती, लोकसंगीत आणि हस्तकला यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची आणि तेथील स्थानिक वैशिष्टे तसेच निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी उपलब्ध करवून देण्यात येत आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
अमृत महोत्सव उपक्रमातर्फे करण्यात आलेल्या Vibrant Villages Program ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले, या युवकांना खरोखरच अत्यंत अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे. मी देशातील सर्वांनाच, विशेषतः युवा वर्गाला विनंती करतो की त्यांनी एकदा देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना भेट द्यायला हवी. या भेटींमुळे आपल्या युवा वर्गाला विविध संस्कृतींची ओळख करून घेता येईल आणि त्यांना सीमेवारील गावांमध्ये राहणार्या स्थानिक नागरिकांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.