

PM Narendra Modi Rojgar Mela 51000 appointment letter
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'रोजगार मेळा' या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या 51000 नव्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. हा कार्यक्रम देशभरातील 47 ठिकाणी एकत्रितपणे पार पडला.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले आणि उमेदवारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "'बिना पर्ची, बिना खर्ची' हे आमचे ब्रीद आहे. रोजगार मेळ्याच्या माध्यमातून लाखो युवकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि ते राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत."
पंतप्रधानांनी सांगितले की काही उमेदवार देशाच्या सुरक्षेसाठी काम करतील, काही 'सर्वांसाठी मदत' या अभियानाचे योद्धा ठरतील, काही आर्थिक समावेशनासाठी योगदान देतील तर काही औद्योगिक विकास वाढवण्यासाठी कार्यरत राहतील.
आपले विभाग वेगवेगळे असतील, पण उद्देश्य एकच – राष्ट्रसेवा," असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
पंतप्रधानांनी हे देखील नमूद केले की भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि गेल्या 11 वर्षांत प्रत्येक क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली आहे.
‘रोजगार मेळा’ हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून 2022 पासून त्यातून देशभरात युवकांना शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध पदांवर रोजगाराची संधी मिळवून दिली जाते.
याचा उद्देश म्हणजे युवकांना देशाच्या विकासात भाग घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना अर्थपूर्ण करिअरच्या वाटेवर उभं करणं. अधिकृत आकडेवारीनुसार, या उपक्रमांतर्गत आतापर्यंत देशभरात 10 लाखांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण झाले आहे.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदे भरून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित करणे. तरुणांच्या माध्यमातून देशाच्या प्रशासन आणि विकास प्रक्रियेला गती देणे.
या नव्या भरती प्रक्रियेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, तसेच कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारख्या महत्वाच्या विभागांचा समावेश आहे.
22 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळ्याचा पहिला टप्प्यात सुमारे 75000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तेव्हा पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
जानेवारी 2023 ते जून 2025 दरम्यान विविध टप्प्यांमध्ये नियमितपणे रोजगार मेळे घेण्यात आले. या काळात 10 लाखांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वाटप झाले, असे अधिकृत आकडेवारीत नमूद आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये सुमारे 71000 नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
संरक्षण, रेल्वे, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातील भरती झाली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये 56000 पेक्षा अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत.