Priyanka Gandhi Vadra : हुकुमशाहीसमोर गांधी परिवार झुकणार नाही : प्रियंका गांधी | पुढारी

Priyanka Gandhi Vadra : हुकुमशाहीसमोर गांधी परिवार झुकणार नाही : प्रियंका गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या मुद्दयावरून काँग्रेसने देशभरात ‘संकल्प सत्याग्रह’ करण्याची घोषणा केली आहे. आज (दि.२६) दिल्लीतील राजघाटावर बोलताना कांँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी (Priyanka Gandhi Vadra) पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती हल्ला केला. देशाचे पंतप्रधान भित्रे आणि अहंकारी आहेत. आता तुम्ही माझ्यावर कोणताही खटला भरू शकता. तुम्ही वाट्टेल ते करू शकता; पण तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेसाठी भुकेलेल्या हुकूमशहापुढे गांधी परिवार झुकणार नाही, असे गांधी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी परिवारवादावर केलेल्या टीकेवर बोलताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) म्हणाल्या, “तुम्ही परिवारवादाबद्दल बोलता, मला विचारायचे आहे की भगवान राम कोण होते? ते ‘परिवारवादी’ होते, की पांडव ‘परिवारवादी’ होते, कारण ते त्यांच्या कुटुंबाच्या संस्कृतीसाठी लढले होते?. आमच्या कुटुंबातील सदस्य देशाच्या लोकांसाठी लढले म्हणून आम्हाला लाज वाटली पाहिजे का? या देशातील जनतेसाठी माझ्या कुटुंबाने लढा दिला? माझ्या कुटुंबाने आपल्या रक्ताचे पाणी करून देशातील लोकशाही वाचवली आहे.”

प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप नेत्यांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही म्हटले आहे. त्यांनी राहुल गांधींचे वडील कोण आहेत, असा प्रश्नही विचारला होता. गांधी कुटुंबाने भारतातील लोकांसाठी आवाज उठवला आणि पिढ्यानपिढ्या सत्यासाठी लढा दिला आहे. परंतु, भाजपने गांधी कुटुंबासह संपूर्ण काश्मिरी पंडित समाजाचा अपमान केला आहे, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.

गौतम अदानी देशाच्या संसद आणि भारतीयांपेक्षा महत्त्वाचे का झाले आहेत. अदानींबाबत प्रश्न विचारला असता तुम्हाला धक्का का बसला?, असा सवालही प्रियंका गांधी यांनी यावेळी केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, माजी मंत्री पी चिदंबरम आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button