ईव्हीएमचा दुरुपयोग होऊ शकतो, निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित करणार, विरोधकांचा निर्णय | पुढारी

ईव्हीएमचा दुरुपयोग होऊ शकतो, निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित करणार, विरोधकांचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. ईव्हीएमचा दुरुपयोग होऊ शकतो. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित करणार असल्याचे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिग्विजय सिंह यांच्यासह शरद पवार, कपिल सिब्बल उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली.

आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. ईव्हीएमबाबत आम्हाला शंका आहे, त्याचे निरसन व्हायला हवे. शिवाय परदेशात कुठेही ईव्हीएमचा वापर केला जात नाही. पण आपणच ईव्हीएम मशीनचा वापर का करत आहोत? असा सवाल ज्येष्ठ विधीज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.

ईव्हीएमबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. त्यानंतर शरद पवारांनी याच विषयावर विरोधी पक्षांची बैठक घेतली. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने आणि आयटी व्यावसायिक आणि क्रिप्टोग्राफर्स यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

CCE च्या अहवालात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालात माहिती तंत्रज्ञान विषयातील नामवंत प्राध्यापक, क्रिप्टोग्राफर्स आणि निवृत्त सरकारी अधिकारी यांची मते आहेत. सिव्हिल सोसायटीने मे २०२२ मध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र सादर केले होते आणि त्यानंतर दोन आठवड्यांनंतर आणखी एक पत्र सादर केले होते. पण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याच्या शक्यतेबाबत सर्वसामान्यांकडूनही शंका उपस्थित केली जात आहे. याची जाणीव निवडणूक आयोगाला करुन देण्यात आली होती. आता शरद पवारांनी (Sharad Pawar) याच प्रश्नी विरोधकांना एकत्र आणत ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला.

 

हेही वाचलंत का?

Back to top button