देशात साडेचार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ | पुढारी

देशात साडेचार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात एकीकडे एच 3 एन 2 फ्लू विषाणुने कहर केला आहे. तर दुसरीकडे कोरोना रूग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. सुमारे साडेचार महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशात कोरोनाचे १ हजार हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ५, ९१५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशभरात ५ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत ४ कोटी ४६ लाखांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत संसर्गाची एकूण १,०७१ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ५, ३०,८०२ झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीनुसार, भारतात एकूण संसर्गाची संख्या 4, 46, 95, 420 वर गेली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.01 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.8 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, कोरोना व्हायरस संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 4, 41, 58, 703 झाली आहे. तर मृत्यू दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे.

दरम्यान,  देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button