Rahul Gandhi : लंडनमधील 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधींनी केला खुलासा | पुढारी

Rahul Gandhi : लंडनमधील 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधींनी केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदीय सल्लागार समितीसमोर त्यांच्या लंडनमधील वक्तव्यावर खुलासा केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय सल्लागार समितीच्या भारताच्या G 20 अध्यक्षपदाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपच्या खासदारांनी या बैठकीदरम्यान त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला.

 राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी लंडनमध्ये देशातील लोकशाहीच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले. भारतातील इतर देशांच्या हस्तक्षेपाचे कथित विधान त्यांनी फेटाळून लावले. या प्रकरणी कोणत्याही बाहेरच्या देशाला हस्तक्षेप होत असल्याचे विधान केले नसल्याचे सांगितले.

 ‘भारतीय लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांचा सरकारकडून विरोधकांविरुद्ध शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. हिंडेनबर्ग अहवाल हा भारतावरील हल्ला नाही, तर तो उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराविरुद्ध होता. अदानी म्हणजे भारत नाही. असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट करत केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi : भाजप खासदारांनी राहुल गांधींवर साधला निशाणा

G-20 संदर्भात झालेल्या बैठकीत परराष्ट्र सचिवांनी तयारीबाबत प्रस्ताव मांडला. यानंतर भाजप खासदारांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला. भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले की, भारताचे ऐतिहासिक G-20 अध्यक्षपद अस्थिर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. हिंडेनबर्ग अहवाल, जॉर्ज सोरोस यांची टिप्पणी आणि बीबीसी डॉक्युमेंटरी हे सर्व भारताला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही लोकांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात लोकशाहीवर हल्ले होत असल्याचे म्हटले आहे. परंतु भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा डाग आणीबाणीचा होता, असे राव म्हणाले.

भाजप खासदारांशी जोरदार वादावादी

यावेळी राहुल गांधी आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना परराष्ट्र मंत्री एस.के. जयशंकर यांनी रोखत बैठकीच्या विषयावरच बोलू, असे सांगितले. या विषयावर तुमचा मुद्दा संसदेत मांडलात तर बरे होईल. यावर राहुल म्हणाले की, माझ्यापूर्वी अनेक खासदारांनी या विषयापासून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा परिस्थितीत यावर मलाही बोलण्याचा हक्क आहे. यावर खासदार महेश जेठमलानी यांनी राहुल गांधींना रोखले. त्यांनी त्यांना आपला वैयक्तिक मुद्दा G20 बैठकीत आणू नये, असे सांगितले.

दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जी-20 बैठकीत राजकीय मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले. ‘G-20 मधील भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांवर आजची चांगली बैठक झाली. परंतु काही सदस्यांनी विनाकारण राजकारण केल्यामुळे या बैठकीला गालबोट लागले. परंतु, या बैठकीत राहुल गांधी यांनी भाजप सदस्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस.के. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन, भाजप खासदार जीव्हीएल नरसिमराव, महेश जेठमलानी, राहुल गांधी, शशी थरूर, शत्रुघ्न सिन्हा, प्रियांका चतुर्वेदी, अनिल हेगडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button