

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांवरील 74 औषधांचे दर निश्चित केले आहेत. प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली होती. बैठकीतील निर्णयांच्या आधारे आदेश 2013 अंतर्गत किरकोळ औषधांचे दर निश्चित करण्यात आले. सामान्यांना त्याचा फायदा होईल.
रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहावे यासाठीच्या डॅपॅग्लिफ्लोझीन, सिटॅग्लिप्टीन तसेच मधुमेहावरील मेटफॉर्मीन हायड्रोक्लोराईडच्या एका गोळीचे दर 27.75 रुपये असतील. उच्च रक्तदाबावरील टेल्मिसार्टन, पिसोप्रोलॉल फ्युमरेट या औषधांची किंमतही कमी करण्यात आली आहे. या औषधांच्या एका गोळीची किंमत 10.92 रुपये असेल.
प्राधिकरण विभागाने 80 अधिसूचित औषधांच्या दरांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यूट्रोपेनिया आणि एपिलेप्सी अशा आजारांवर उपचार म्हणून दिल्या जाणार्या औषधांचाही या यादीमध्ये समावेश आहे. फिल्गॅस्टीम (एक व्हायल) या इंजेक्शनचे दर 1,034.52 रुपये ठरवले आहेत. सोडियम व्हॅल्प्रोएटची एक गोळी आता 3.20 रुपयांना मिळणार आहे. हायड्रोकॉर्टिसनची एक गोळी 13.28 रुपयांत मिळेल.