नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: भारताच्या सार्वभौमत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी घाला घालत आहेत. भारत हा सर्वधर्मियांचा आहे. त्यांच्यात एकप्रकारचे नाते आहे. हे नाते तोडण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
केरळमधील मलप्पुरम येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कालच सीपीआय नेता कन्हैयाकुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेस प्रवेश झाला आहे.
त्यानंतर राहुल गांधी ॲक्शनमोडमध्ये आल्याचे दिसत आहे.
गांधी यांचे कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, 'तुम्हाल भारत समजून घ्यायचाय आणि तुम्ही जर तुम्ही सावरकरांचा इतिहास वाचला तर तुम्हाला केवळ भूगोल दिसेल. ते पेनाने नकाशा काढतात आणि या रेषेच्या आत जो दिसतो तो भारत आहे असे सांगतात.
मात्र, भारत हा विविध जातीधर्मांच्या लोकांनी निर्माण झालेला एक महान देश आहे. येथे हिंदू-मुस्लिमांचे नाते आहे, हिंदू-मुस्लिम आणि शीखांचा हा भारत आहे.
हिंदी, तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचे एकमेकाशी एक नाते आहे. हे नाते तोडण्याचे काम पंतप्रधान करीत आहेत.
पंतप्रधान भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे.
लोकांमध्ये नात्यांचा हा पूल बांधणे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठीच मी त्यांचा कट्टर विरोधक म्हणून उभा आहे, असेही ते म्हणाले.
कन्हैयाकुमार यांनीही यावेळी पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधान हे लोकशाहीतील मोठे पद आहे. ते नेहमी राहील. पण आज खऱ्या अर्थाने भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जेव्हा वादळात मोठे जहाज बुडाले तर लहान होड्यासुद्धा बुडून जातात हे लक्षात घ्या. आमच्यावर आरोप झाल्यानंतर आमच्या पक्षाशी, माझ्याशी कुठलाही संबध नसताना ते लढत होते. हे लोक खऱ्या अर्थाने न्यायाची बाजू लावून धरत आहेत. त्या लोकांना सत्याची चाड आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.