Vodafone Idea ला मोठा दिलासा, 16,133 कोटींची व्याजाची रक्कम इक्विटीत बदलण्यासाठी मंजुरी

Vodafone Idea
Vodafone Idea

पुढारी ऑनलाइन डेस्क : कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडिया Vodafone Idea कंपनीला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने कर्जबाजारी व्होडाफोन आयडियाच्या 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रुपांतर करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. या किमतीत 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर सरकारला जारी केले जातील. यामुळे सरकारला कंपनीतील 35 टक्के हिस्सा मिळणार आहे.

Vodafone Idea Limited (VIL) ही कंपनी Vodafone आणि Idea च्या विलिनीकरणानंतर स्थापन झाली. VIL ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर होती. 2018 मध्ये या कंपनीचे 35 टक्के मार्केट शेअरसह 430 दशलक्ष मोबाईल ग्राहक होते. मात्र, आज ही कंपनी कर्जाच्या खाईत बुडाली आहे. कर्जबाजारी झाल्याने कंपनी तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे. तसेच कंपनीकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने व्याज देयाची रकम इक्विटीत रुपांतर करून भारत सरकारला देण्याचा प्रस्ताव दिला होता.

Vodafone Idea कंपनीने भारतीय शेअर बाजाराला काल शुक्रवारी सांगितले की, "संचार मंत्रालयाने शुक्रवारी 3 फेब्रुवारीला एक आदेश पारित केला आहे. या आदेशान्वये कंपनीला स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते पुढे ढकलण्याशी संबंधित व्याज आणि सकल समायोजित महसूल (एजीआर) जो देय आहे. त्याला इक्विटी शेअरमध्ये बदलावे आणि भारत सरकारला जारी करावे.

VIL ने पुढे सांगितले की, 1,61,33,18,48,990 रुपयांची रकम इक्विटी शेअर्समध्ये रुपांतरित करायची आहे. कंपनीला प्रत्येकी 100 रुपये दर्शनी मूल्याचे 16,13,31,84,899 इक्विटी शेअर्स जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांची इश्यूची किंमत देखील 10 रुपये आहे."

Vodafone Idea ने यापूर्वी म्हटले होते की, थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर केल्यास सरकारला कंपनीतील सुमारे 35 टक्के हिस्सा मिळेल. सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर केलेल्या सुधारणा पॅकेज अंतर्गत कंपनीला हा दिलासा मिळाला आहे.

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, Vodafone Idea कंपनी चालवण्यासाठी आणि आवश्यक गुंतवणूक आणण्यासाठी आदित्य बिर्ला समूहाकडून दृढ वचनबद्धता मिळाल्यानंतर सरकारने व्होडाफोन आयडियाची थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, सरकारला भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये बीएसएनएल व्यतिरिक्त इतर तीन कंपन्यांची उपस्थिती हवी आहे जेणेकरून ग्राहकांना त्यांची निरोगी स्पर्धा मिळू शकेल.

दूरसंचार नियामक ट्रायच्या ताज्या आकडेवारीनुसार, Vodafone Idea कंपनीचे 24.3 कोटी मोबाइल ग्राहक आहेत आणि तिचा बाजारातील हिस्सा 21.33 टक्के आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news