

नवी दिल्ली : ४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतील भारत मंडपम येथे भरलेला हा व्यापार मेळावा १४-२७ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. हा मेळावा दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत खुला राहणार आहे. दरम्यान, ‘विकसीत भारत @ २०४७’ ही यावर्षीची मेळाव्याची थीम आहे. भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेद्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, भारत व्यापार प्रोत्साहन संघटनेला जागतिक दर्जाची संस्था म्हणून विकसित करण्याची सरकारची योजना आहे. केंद्र जलद व्यवहार सक्षम करण्यासाठी मेळाव्याच्या आसपास किऑस्क उभारण्याचा विचार करत आहे. भारतातील प्रदर्शने हे जगासाठी वन-स्टॉप शॉप असले पाहिजे. भारत परदेशी खरेदीदारांना आमंत्रित करण्यासाठी जगभरात मेळावे आयोजित करेल, असेही ते म्हणाले.
४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात देश-विदेशातील ३५०० हून अधिक स्टॉल्सधारक सहभागी होत आहेत. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या व्यापार मेळ्यांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाला दररोज जवळपास एक लाख लोक भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मेळाव्यात बिहार आणि उत्तर प्रदेश भागीदार राज्ये म्हणून सहभागी होत आहेत, तर झारखंड हे या मेळाव्याच्या केंद्रस्थानी असलेले राज्य आहे. एकूण ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, ४९ केंद्रीय मंत्रालये, कमोडिटी बोर्ड, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, टायटन, जिंदाल स्टील अँड पॉवर, जेएसडब्ल्यू स्टील, रिलॅक्सो, हॉकिन्स आणि वुडलँड कंपन्या त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत. तसेच चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, स्वीडन, थायलंड, तुर्की, ट्युनिशिया, लेबनॉन, किरगिस्तान आणि दुबई हे देश सहभागी आहेत.