Armed Forces Veterans Day : माजी सैनिक दिनानिमित्त सीडीएस, लष्करप्रमुखांचे शहीद जवानांना अभिवादन

Armed Forces Veterans Day : माजी सैनिक दिनानिमित्त सीडीएस, लष्करप्रमुखांचे शहीद जवानांना अभिवादन

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : सैन्य दलातील माजी सैनिकांनी बजावलेला सेवेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिवस माजी सैनिक दिन  (Armed Forces Veterans Day) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत आज ( दि.१४) सकाळी सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. या वेळी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांना अभिवादन करीत पुष्पांजली अर्पण केली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी तसेच नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी. कुमार उपस्थित होते.

दरम्यान, (Armed Forces Veterans Day)  मानेकशॉ सेंटरमध्ये आयोजित समारंभात लष्करप्रमुखांनी माजी सौनिकांना संबोधित केले. देशाच्या माजी सैनिकांचे अदम्य शौर्य तसेच बलिदानाच्या परिणामस्वरुप भारतीय सशस्त्र दल जगातील सर्वश्रेष्ठी लष्करामध्ये समाविष्ट आहे, असे प्रतिपादन लष्कर प्रमुखांनी केले. सातव्या सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिकांच्या योगदानाने प्रेरित होवून सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवा कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे, असा विश्वास जनरल पांडे यांनी व्यक्त केला.

तिन्ही दलातील माजी सैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते. आज भारताच्या सशस्त्र दलांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ दलांमध्ये केली जाते. ही ओळख माजी सैनिकांचे बलिदान, असामान्य शौर्य तसेच कठीण परिश्रमाचा परिपाक आहे, असे लष्कर प्रमुख म्हणाले.

माजी सैनिकांचे प्रयत्न, दुरदर्शी नेतृत्व, आकांक्षा तसेच नि:स्वार्थ प्रयत्नांचा परिणाम म्हणजे आजचे सशस्त्र दल आहेत, अशी भावना नौदल प्रमुखांनी व्यक्त केली. ज्यांनी राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित केले, अशा शूर जवानांचे पुण्यस्मरण करीत त्यांना श्रद्धांजली देण्याचा हा दिवस आहे. माजी सैनिकांचा वैभवशाली वारसा पुढे घेण्यासाठी कुठलाही कसर सोडणार नाही, असे आश्वासन नौदल प्रमुखांनी दिले. तर, वायुदल वायुदलातील जवानांच्या भलाईसाठी पूर्णत: प्रतिबद्ध आहे, असे आश्वासन यावेळी वायूदल प्रमुखांनी दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news