Cold wave | उत्तर भारतात थंडीची लाट; ‘डार्क यलो अलर्ट’ जारी, हार्टॲटॅक-ब्रेन स्ट्रोकने २५ जणांचा मृत्यू! | पुढारी

Cold wave | उत्तर भारतात थंडीची लाट; ‘डार्क यलो अलर्ट’ जारी, हार्टॲटॅक-ब्रेन स्ट्रोकने २५ जणांचा मृत्यू!

कानपूर : वृत्तसंस्था; उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थंडीची तीव्रता सर्वाधिक आहे. रात्रीचे तापमान येथे 3.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. गुरुवारी कानपुरातील दोन सरकारी रुग्णालयांत हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांचा मृत्यू झाला, यावरून थंडीच्या कडाक्याची तीव्रता जाणवते.

सर्व राज्यांतून अलर्ट जारी करण्यात आला असून, उत्तर प्रदेशात ‘डार्क यलो अलर्ट’ जारी आहे. राजधानी लखनौत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथे एका मेडिकल स्टोअरमध्ये ओआरएस घेण्यासाठी आलेल्या तरुणाला (संजय, वय 23, रा. एटा) काऊंटरवरच हृदयविकाराचा झटका आला आणि तो छातीला हात लावून खाली कोसळला. थंडीमुळे ही घटना घडल्याचे मानले जात आहे.

दिल्लीतील एका भागात किमान तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. अन्य भागांतूनही सरासरी 3 अंश तापमान दिल्लीत आहे. रविवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील पाच दिवस लोकांना दिलासा मिळेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दिल्लीतील द़ृश्यता काही प्रमाणात सुधारली असली; तरी हवा मात्र खराब आहे. काही भागांत ‘ऑरेंज’, तर काही भागांत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

विमानसेवेवर विपरीत परिणाम

हवाई वाहतुकीवरही झाला असून, द़ृश्यमानता कमी असल्याने 60 विमानांचे आगमन आणि प्रस्थान लांबल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Cold wave)

बिकानेरला पारा शून्यावर

राजस्थानातील बिकानेरमध्ये किमान तापमान शून्य अंश सेल्सिअस नोंदविले गेले. चुरूत 1.0, तर मध्य प्रदेशातील नौगोंग तसेच छतरपूर जिल्ह्यात 0.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. शनिवारी हिमालय परिसरात पाऊस व बर्फवृष्टी होईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारत व मध्य भारतातील पारा घसरेल. मध्य प्रदेशातील 14 जिल्ह्यांत धुक्यामुळे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

268 रेल्वेगाड्या रद्द

रेल्वेकडून शुक्रवारी 268 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. 47 गाड्या ठराविक ठिकाणांपर्यंत चालविण्यात आल्या; तर 19 गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. शिवाय, 18 गाड्यांची वेळ बदलण्यात आली होती.

राजस्थान गारठले @ -6

  • राजस्थान : पारा शून्याखाली गेला आहे. उणे 6 अंश तापमान आहे.
  • हिमाचल प्रदेश : सिमला, डलहौसी, कांगडा येथे तापमान
    3 अंशांखाली.
  • दिल्ली : तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. ‘ऑरेंज अलर्ट’ जारी.
  • गुजरात : कडाक्याची थंडी. येत्या सोमवारी तापमान 10 अंशांखाली जाणे शक्य आहे.

 

Back to top button