Corona Booster Dose : कोरोनाला रोखण्यासाठी दुसरा ‘बूस्टर डोस’ द्या : ‘आयएमए’ची आरोग्य मंत्रालयाला शिफारस | पुढारी

Corona Booster Dose : कोरोनाला रोखण्यासाठी दुसरा 'बूस्टर डोस' द्या : 'आयएमए'ची आरोग्य मंत्रालयाला शिफारस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाने चीन, जपान, दक्षिण कोरिया तसेच थायलंडसह अनेक देशांमध्ये पुन्हा डोकं वर काढले आहे. जगातील इतर देशांमध्‍ये कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भारतात देखील कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक लसीकरण अभियानात चौथा डोस (Corona Booster Dose) समाविष्ट करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्र सरकारकडे केल्याचे कळतेय.

कोरोना महारोगराई पुन्हा उफाळून आलेल्या देशांमधे बूस्टर डोस देऊन देखील ही स्थिती उद्भवल्याने सरकारने नागरिकांना संपूर्ण लसीकरण तसेच बूस्टर डोस नंतर आणखी एक बूस्टर डोस (Corona Booster Dose) देण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह ‘आयएमए’ने केल्याचे समजतेय.

देशातील बूस्टर डोस संदर्भातील आकडेवारी निराशाजनक आहे. देशात आतापर्यंत केवळ २२.३७ कोटींच्या घरात बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अशात बूस्टर डोस सक्तीचे करण्याच्या अनुषंगाने सरकार कडून चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. देशवासीयांना कोरोना लसीकरणाअंतर्गत दोन डोस लावण्यात आले आहेत.

बूस्टर डोस लावण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. अशात चीनसह इतर देशांमधे उद्भवलेल्या परिस्थितीनंतरच चौथा डोस लावण्याची शिफारस केली जात असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने अद्याप या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. १ डिसेंबर २०२२ रोजी ही संख्या ३०० च्या घरात होती. परंतु, २५ डिसेंबरपर्यंत ही संख्या सरासरी १६३ पर्यंत पोहोचली.

Corona Booster Dose  : देशातील बूस्टर डोस ची स्थिती

१)  आरोग्य कर्मचारी-     ७०,९९,४२९
२)  फ्रंटलाईन वर्कर्स-      १,३८,०८,५८९
३)  १८ ते ४४ वयोगटात-  १०,२७,२९,०३०
४)  ४५ ते ६० वयोगट –    ५,१४,६०,७२५
५)  ६० वर्षाहून अधिक-    ४,८६,८८,६५०

हेही वाचा :  

Back to top button