Covid 19 : सावध राहिलो, तर सुरक्षित राहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

Covid 19 : सावध राहिलो, तर सुरक्षित राहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर्षी देशाला नवी गती मिळाली आहे. चीनमधील कोरोनाचे संकट पाहता साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशवासीयांनी खबरदारी घ्यावी. आपण सावध राहिलो, तर आपणही सुरक्षित राहू. सर्वांनी मास्क आणि हात धुणे याची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचे स्मरण करण्याचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये देशवासीयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशाला अपवादात्मक नेतृत्व देणारे वाजपेयी एक महान राजकारणी होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांचे विशेष स्थान आहे. मोदी यांना कोलकाता येथून आस्था नावाच्या मुलीचे पत्र मिळाले होते. यामध्ये तिने नुकत्याच झालेल्या दिल्ली भेटीचा उल्लेख केला आहे. ती म्हणाली की, पीएम यांनी म्युझियमला भेट देण्यासाठी वेळ काढला. या संग्रहालयातील अटलजींची गॅलरी तिला खूप आवडली असल्याचे त्या मुलीने उल्लेख केला असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

2025 पर्यंत देश टीबीमुक्त झाला पाहिजे

आम्ही भारतातून पोलिओसारख्या आजाराचा नायनाट केला आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळाआजार नावाचा हा आजार आता झपाट्याने संपत आहे. या भावनेने आम्ही भारताला 2025 पर्यंत टीबीमुक्त करू. यापूर्वी जेव्हा टीबीमुक्त भारत मोहीम सुरू झाली तेव्हा हजारो लोक रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले, हे तुम्ही पाहिलेच असेल, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Back to top button