

नवी दिल्ली : स्वामित्व कोष योजनेच्या दुसर्या टप्प्यामध्ये रखडलेल्या 40 हजार घरांचे काम 2025 मध्ये पूर्ण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2020 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातल्या रखडलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टसचे काम पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटींच्या स्वामित्व फंडाची घोषणा केली होती. कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या घरांसाठीच्या योजनेसाठी या फंडातून मदत करण्यात आली आहे. त्यामुळे 50 हजारांपेक्षा जास्त रखडलेल्या हाऊसिंग प्रोजेक्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर आता या स्वामित्व कोषाच्या दुसर्या टप्प्यामध्ये 40 हजार घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
अर्थमंत्री सीतारामन घरांच्या संदर्भात कोणती घोषणा करणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. आपल्या घराचे काम पूर्ण होण्याची वाट पाहणारे आणि घराचे पझेशन कधी मिळणार याची वाट बघत असलेल्यांसाठी अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी 40 हजार घरांचे रखडलेले काम पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी खास आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी रखडलेल्या एक लाख गृहप्रकल्पांसाठी 15 हजार कोटी रुपयांच्या स्वामित्व कोषाची घोषणा केली. त्यातून रखडलेल्या गृहप्रकल्पांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी किफायतशीर आणि मध्यमवर्गीयांना परवडतील अशांसाठी विशेष कोषांची घोषणा केली होती. या स्वामित्व कोषाचे व्यवस्थापन स्टेट बँक समूहातील एसबीआय कॅप व्हेंचर ही लिमिटेड कंपनी करते. अर्थमंत्री सीतारामन यांनी पहिल्या कोशास आलेल्या यशानंतर स्वामित्व कोष-2 ची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 50 हजार घरे पूर्ण झाली आहेत. घरे खरेदी केलेल्यांना घरांचा ताबा दिलेला आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, जुलैमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात शहरांना विकासाचे केंद्र करून त्यांचा रचनात्मक विकास करण्याची घोषणा केली होती. पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था सुधारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी एक खास फंड तयार करण्याचे जाहीर केले होते. त्याचे नाव ‘शहरी आव्हाने निधी’ असे असून त्यासाठी निधी एक लाख कोटी असेल. 2025-26 मध्ये या योजनेसाठी 10 हजार कोटी निधी वितरित करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेत 25 टक्के निधी मिळेल, त्याशिवाय 50 टक्के बाँड, कर्ज, अथवा पीपीपीतून उभा करावा लागेल.