

4 Al-Qaeda Terrorists Arrested In Gujarat
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात ATS ने अल-कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, हे दहशतवादी बनावट चलन रॅकेट चालवत होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतीचे विचार पसरवत होते. यापैकी एकाला इतर राज्यातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ATS कडून देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत गुजरात ATS ने सांगितले की, अटक करण्यात आलेले दहशतवादी भारतात लोकशाही व्यवस्थेला हटवून शरीयत कायदा लागू करण्याच्या उद्देशाने कट रचत होते.
मोहम्मद फैक
मोहम्मद फर्दीन
सेफुल्ला कुरेशी
झीशान अली
वापरले तंत्रज्ञान
हे आरोपी ‘ऑटो-डिलीट’ अॅप्स वापरून आपला संवाद व डिजिटल पुरावे पुसण्याचा प्रयत्न करीत होते, असे सूत्रांकडून समजते. हे अॅप्स संवादानंतर आपोआप मेसेजेस आणि डेटा हटवतात, त्यामुळे तपास यंत्रणांना पुरावे मिळणे कठीण होते.
कुटुंबाला कल्पना नाही...
अटक करण्यात आलेल्या सेफुल्ला कुरेशीचा भाऊ अमीन कुरेशी याने PTI ला सांगितले की, सेफुल्ला घरी अगदी सामान्य वर्तन करत होता आणि कुटुंबाला त्याच्या कारवायांची कोणतीच कल्पना नव्हती.
हे आरोपी अल-कायदाशी अनेक वर्षांपासून संबंधित असल्याचे संकेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा अल-कायदाशी संपर्क आला. बनावट चलन प्रकरणात सहभागी असून त्याद्वारे निधी गोळा केला जात होता. हे सर्वजण गुजरातमध्ये दहशतवादी हालचालींबाबत चर्चा करताना ATS च्या रडारवर आले.
या आरोपींकडून तलवारी, अल-कायदाचे प्रचार साहित्य, आणि समाजमाध्यमांवरील भडकाऊ पोस्ट्स जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिस, उत्तर प्रदेश ATS आणि केंद्रीय यंत्रणांच्या संयुक्त कारवाईने हे चारही आरोपी 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहेत. आरोपींना आर्थिक मदत कुठून मिळत होती, याचा तपास सुरु आहे.
ATS चे DIG सुनील जोशी यांनी माहिती दिली की, या दहशतवादी मॉड्युलचे पाकिस्तानशी संबंध होते आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधला जात होता. यामध्ये दिल्लीचा मोहम्मद फैक (मुख्य सूत्रधार) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करत होते, जिहादचा प्रचार करत होते आणि भारतविरोधी कारवायांचे नियोजन करत होते.
सध्या चौकशी सुरू
चौघांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे सोशल मीडिया हँडल्स, चॅट्स व इतर डिजिटल साधनांचे विश्लेषण सुरू आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा उगम अफगाणिस्तानातील मक्तब-अल-खिदमात या संस्थेतून झाला. ही संस्था ओसामा बिन लादेनचा गुरू शेख अब्दुल्ला अझ्झाम यांनी स्थापन केली होती.
1996 ते 2001 या काळात अल-कायदा तालिबानच्या आश्रयाने अफगाणिस्तानातून कार्यरत होते. त्यानंतर या संघटनेने आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका येथे अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले.
दरम्यान, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पुरावे पुसण्याचे प्रकार वाढल्याने सुरक्षा यंत्रणांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. ATS चा तपास सुरू असून यापुढे आणखी अटीतटीच्या कारवाया होण्याची शक्यता आहे.