भारतीय लष्कराची कमाल : पाकिस्तानी ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी घारींना प्रशिक्षण | पुढारी

भारतीय लष्कराची कमाल : पाकिस्तानी ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी घारींना प्रशिक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय सैन्य दलाने (Indian Army) पाकिस्तानी शत्रूच्या ड्रोनवर नजर ठेवण्यासाठी घारींंना प्रशिक्षण दिले आहे.  उत्तराखंडमधील औली येथे सुरू असलेल्या संयुक्त युद्धाभ्यास प्रशिक्षण सरावादरम्यान याबाबतचे प्रात्यक्षिक भारतीय सैन्य दलाला दाखविण्यात आले. प्रशिक्षित केलेल्या घारींना ‘अर्जुन’ असे नाव देण्यात आले आहे.

भारत-अमेरिका 18 व्या संयुक्त प्रशिक्षण सराव ‘युद्ध अभ्यास 2022’ला शनिवारी (दि. २६) उत्तराखंडच्या औली येथे सुरुवात झाली आहे. दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये सर्वोत्तम सराव, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने युद्ध अभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो. हा युद्ध अभ्यास १५ दिवसांचा आहे. जो उच्च उंचीवर आणि अत्यंत थंड हवामानातील युद्धावर केंद्रित असेल. मागील सराव ऑक्टोबर 2021 मध्ये जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ रिचर्डसन, अलास्का (यूएस) येथे आयोजित करण्यात आला होता. 11 व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या 2 री ब्रिगेडचे यूएस आर्मीचे सैनिक आणि आसाम रेजिमेंटचे भारतीय सैनिक या सरावात सहभागी झाले होते.

शत्रूच्या ड्रोनची शिकार करण्यासाठी प्रशिक्षित घारींचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रग्स, बंदुका आणि पैशांची पाकीटे पाकिस्तानकडून येणाऱ्या ड्रोनने सोडल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अलीकडेच 24 नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जम्मूच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि भारतीय चलनाची पाकीटे जप्त केली आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय भागात येणाऱ्या ड्रोनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षित घारींची सुरक्षा दलांना मदत होऊ शकते, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button