Rahul Gandhi In Nanded : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादला : राहुल गांधी | पुढारी

Rahul Gandhi In Nanded : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादला : राहुल गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी (दि.७) महाराष्ट्रात दाखल झाली. ही यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली असून काँग्रेस नेते राहुल गांधीच्या यांच्या या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यात्रेत संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटबंदी आणि जीएसटीवरून निशाना साधला आहे. नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर कर लादण्यात आला. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांवर, खतांवर कर लादण्यात आला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. (Rahul Gandhi In Nanded)

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी नोटबंदी केली. तेव्हा ते म्हणाले होते की, काळ्या पैशाविरूद्ध मी लढत आहे. यानंतर काही दिवसांनी ते म्हणाले होते की काळा पैसा बाहेर नाही आला तर फाशी द्या. त्यांच्या या भाषणानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, असा उपाहासत्मक टोलाही राहुल गांधी यांनी या वेळी लगावला. (Rahul Gandhi In Nanded)

आम्ही ‘भारत जोडो यात्रे’त चालत नाहीत. तर तुमचे प्रेम आम्हाला पुढे नेत आहे. सकाळी ६ वाजल्यापासून आम्ही चालत आहोत. मात्र अजूनही थकलेलो नाही. आम्ही थकत नाही कारण हिंदुस्थानची शक्ती आमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांची शक्ती आमच्या सोबत आहे, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ((Rahul Gandhi In Nanded)

पुढे गांधी म्हणाले, आम्ही रस्त्यावर ७-८ तास चालतो. शेतकऱ्यांना भेटतो, युवकांना भेटतो. त्यांचे दु:ख समजून घेतो. मी एकटा नाही. काँग्रेस पक्षाचे नेतेही माझ्यासोबत चालत आहेत. तुम्ही ज्या रस्त्यावरून चालता त्याच रस्त्यावर आम्ही चालत आहोत. विमानाने किंवा वाहनामध्ये नाही. आज दोन लहान मुलांना भेटलो. त्यांना विचारलं काय करू इच्छिता. ते म्हणाले सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याचे स्वप्न पाहतो. यानंतर मी त्यांना विचारलं तूम्ही कधी कम्प्यूटर पाहिला आहे का? तर त्यांनी उत्तर दिले की आम्ही कधी कम्प्यूटरच पाहिला नाही. मग मी त्यांना पुढे प्रश्न केला की, तुझ्या शाळेत कम्प्युटर नाही का? त्यालाही त्यांनी नाही म्हणत प्रत्युत्तर दिले. शाळेत कम्प्यूटर नाही कारण हिंदुस्तानातील पैसा दोन व्यक्तींच्या खिशात जात आहे, असेही गांधी यांनी यावेळी मोदी यांच्यावर टीका केली. (Rahul Gandhi In Nanded)

हेही वाचलंत का?

Back to top button