Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील द्रौपदी दांडा शिखरावर हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू | पुढारी

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील द्रौपदी दांडा शिखरावर हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाइन डेस्क : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथे द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर 28 गिर्यारोहक हिमस्खलनात अडकले. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे प्राचार्य कर्नल बिश्त यांनी सांगितले की, हिमस्खलनात अडकलेल्या 28 पैकी 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तरीही 18 जण बेपत्ता आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने दोन चित्ता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

द्रौपदीचा दांडा 2 पर्वत शिखराची उंची 5,006 मीटर इतकी आहे. उत्तरकाशी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की हिमस्खलनात अडकलेल्यांमध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (NIM) चे प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. गिर्यारोहकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

Back to top button