5G launch in India : जिओ डिसेंबर २०२३ पर्यंत 5G सेवा सुरू करणार : मुकेश अंबानी | पुढारी

5G launch in India : जिओ डिसेंबर २०२३ पर्यंत 5G सेवा सुरू करणार : मुकेश अंबानी

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण भारतात जिओच्या माध्यमातून डिसेंबर २०२३ पर्यंत 5G टेलिफोन सेवा (5G launch in India)  सुरू करण्यात येणार आहे. भारतातील प्रत्येक गावात, तालुक्यात 5G सेवा पोहोचवण्याचे मी वचन देतो, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांनी म्हटले आहे. आज (दि.१) नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ६ व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ वी इंडिया मोबाईल काँग्रेसमधून 5G सेवा सुरू केल्याची घोषणा केली. यावेळी प्रगती मैदानावरील प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे म्हणाले की, 5G हे कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. मूलभूत तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आणि मेटाव्हर्स यांसारख्या पायाभूत तंत्रज्ञानाच्या क्षमता २१ व्या शतकात पूर्णपणे विस्तारणार आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. COAI (सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया) आणि दूरसंचार विभाग यांना आम्ही सांगतो की, आम्ही नेतृत्व घेण्यास तयार आहोत. इंडियन मोबाईल काँग्रेस आता आशियाई मोबाइल काँग्रेस आणि ग्लोबल मोबाइल काँग्रेस बनली पाहिजे, अशी इच्छा अंबानी यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, 5G दूरसंचार सेवा अखंड कव्हरेज, उच्च डेटा दर, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संप्रेषण प्रणाली प्रदान करण्याचा प्रयत्न करणार करेल. भारतातील 5G ​​तंत्रज्ञानाची क्षमता दर्शविण्यासाठी देशातील तीन प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सनी पंतप्रधानांसमोर प्रात्याक्षिके दाखवली. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतात 5G सेवा सुरू केल्याबद्दल भारताचे अभिनंदन करत दूरसंचार क्षेत्रात परवानग्या आणि मंजुऱ्या कशा सहज मिळतात, याचाही त्यांनी उल्लेख केला. (5G launch in India)

हेही वाचलंत का ? 

Back to top button