नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे (Shinzo Abe) यांच्यावर मंगळवारी (दि.२७) अंत्यसंस्कार केले जाणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अबे यांच्या अंत्यसंस्कारास हजर राहण्यासाठी मोदी जपानला जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.
जपान दौऱ्यावेळी मोदी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. केवळ मोदीच नाही, तर जगातील विविध देशांचे प्रमुख शिंजो अबे (Shinzo Abe) यांच्या अंत्यसंस्कारास हजर राहणार आहेत. गेल्या ८ जुलैरोजी अबे यांची प्रचार मोहिमेदरम्यान गोळी घालून हत्या करण्यात आली होती. आशियाई प्रशांत क्षेत्रातील चीनच्या दादागिरीविरोधात अबे यांनी आवाज उठविला होता. तसेच जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी विविध धोरणे राबविली होती. चीनला शह देण्यासाठी क्वाड संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेच्या स्थापनेतही अबे यांचा पुढाकार होता.
अबे यांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी यांच्यासह अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज टोकियोत उपस्थित राहणार आहेत. अंतिम संस्कारासाठी सुमारे १२ लाख डॉलर म्हणजे ९७ कोटीॉहून अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने या खर्चिक अंत्यसंस्काराला विरोध दर्शवला आहे. तर विरोध पक्षनेत्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचलंत का ?