विरोधकांनी एकजूट केल्यास भाजपला पराभूत करू : शरद पवार | पुढारी

विरोधकांनी एकजूट केल्यास भाजपला पराभूत करू : शरद पवार

हिस्सार ः वृत्तसंस्था बिहारमध्ये सात राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. 2024 मध्ये भाजप देशात जिंकू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण देशाला संघटित करायला हवे. याबाबत आम्ही काँग्रेसलाही विनंती केली आहे. काँग्रेससह प्रमुख पक्षांची एकजूट झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेपासून दूर राखण्यात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या नेत्यांनी भाजपच्या कारभारावर निशाणा साधला. आता केंद्रातील भाजप सरकार बदलण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी एकजूट दाखविल्यास भाजपला आपण नक्कीचे रोखू, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले.

देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त हरियाणातील फतेहाबादमध्ये सन्मान रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख ओमप्रकाश चौताला यांनी राष्ट्रवादीचे नेतेे शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह 10 राज्यांतील 17 नेत्यांना आमंत्रित केले होते; मात्र व्यासपीठावर केवळ पाच नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवार, नितीशकुमार, तेजस्वी यादव, सुखबीर सिंग बादल आणि सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, प्रकाश सिंह बादल, गुलाम नबी आझाद, एच. डी. देवेगौडा, चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, फारूख अब्दुल्ला यांनाही आमंत्रित करण्यात आले होते; मात्र ते रॅली उपस्थित राहिले नाहीत.

देशात परिवर्तन नक्की घडेल : शरद पवार

आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍यांना हटवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधी पक्ष एकत्र येऊन देशात 2024 मध्ये सत्ता बदल घडवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी भाजपवर टीकास्त्र सोडले. देशातील परिस्थितीत बदल घडवून आणू. देशात सत्ता परिवर्तन घडवू. 2024 मध्ये संधी मिळेल, तेव्हा देशात सत्ता बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू, त्याची सध्या गरज असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

Back to top button