‘पक्षात राहुल गांधींचे विशेष स्थान नेहमी राहील’ | पुढारी

‘पक्षात राहुल गांधींचे विशेष स्थान नेहमी राहील’

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील किंवा होणार नाही; पण पक्षात त्यांचे विशेष स्थान कायम राहील. कारण, पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मान्यता असलेले ते नेते आहेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसंमतीचा असावा, असेही ते म्हणाले.

काँग्रेस कार्यकारीणी समितीचे सदस्य असलेले चिदम्बरम एका मुलाखतीत म्हणाले की, पक्षाध्यक्ष निवडणुकीतील निष्पक्षता आणि पारदर्शकता याबाबत काहीही वाद होणार नाही. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी काही नेत्यांच्या शंकांवर पहिल्या दिवशीच स्पष्टीकरण दिले असते तर निवडणुकीतील पारदर्शकतेचे प्रकरण तेव्हाच मिटले असते. उलट त्यांनी कोणताच पक्ष मतदारांची यादी प्रकाशित करत नाही, असे वक्तव्य केले होते. मतदार यादी प्रदेश कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असेल. तर अखिल भारतीय मतदारांची यादी एआयसीसीच्या कार्यालयात असेल.

Back to top button