Ganesh laddu : गणपतीच्या ५ किलो वजनाच्या लाडूला मिळाली ६०.८० लाखांची विक्रमी किंमत | पुढारी

Ganesh laddu : गणपतीच्या ५ किलो वजनाच्या लाडूला मिळाली ६०.८० लाखांची विक्रमी किंमत

हैदराबाद: पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेशोत्सवादरम्यान लाडू लिलावाचा आतापर्यंतचा विक्रम मोडून काढत ५ किलो वजनाच्या लाडूला ६०.८० लाखांची विक्रमी किंमत मिळाली. हैदराबादमधील राजेंद्रनगरच्या सन सिटीमधील (Ganesh laddu) कीर्ती रिचमंड व्हिलामध्ये गणेशोत्सवाच्या अकराव्या दिवशी लिलाव करण्यात आला. कनाजीगुडा लाडूला लिलावात ४६.९० लाख मिळाले होते. तो आतापर्यंतचा सर्वात महाग लाडू मानला जात होता. परंतु आता सन सिटी लाडूने आता कनाजीगुडा लाडूची जागा घेतली आहे. लाडूला मिळालेली ही रक्कम धर्मादाय कार्यासाठी वापरली जाईल, असे आयोजकांनी सांगितले.

सन सिटी  (Ganesh laddu) लाडूचा लिलाव हा २०० हून अधिक रिचमंड व्हिला रहिवाशांनी क्राउड-फंड केलेला उपक्रम होता. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसानंतर ते एकत्र आले आणि त्यांनी आपापसात बोली लावून ६०.८० लाख जमा केले. दरम्यान, हैदराबादमधील इतर गणेश लाडू लिलावांत मोठी किंमत मिळाली. सिकंदराबाद येथील मिलिटरी डेअरी फार्मजवळील कनाजीगुडा येथे झालेल्या या लिलावात पंडाल आयोजकांना ४६ लाख रुपये मिळाले. सन सिटी लिलावापर्यंत ही सर्वाधिक रक्कम होती. या लाडूचे वजन सुमारे १२ किलोग्रॅम होते. २१ किलोच्या बाळापूर लाडूचा शुक्रवारी खुल्या लिलावात २४.६० लाखांना लिलाव झाला.

सर्व प्रमुख लाडूंचे लिलाव गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी होतात. या वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटी काही लिलाव झाले. भक्तांचा असा विश्वास आहे की लिलावातील लाडू त्यांना नशीब, आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देतात. दरम्यान, हैदराबादमध्ये यंदाचा गणेशोत्सव आणि मिरवणूक शांततेत पार पडली. हुसेन सागर, सरूरनगर, रमांथपूर आणि मलकाजगिरी तलाव तसेच तात्पुरत्या तलावांमध्ये कडेकोट बंदोबस्तात हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button