नवी दिल्ली : वृत्तसंस्था भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना अन्न घालणारे जबाबदार राहतील. तसेच जखमी व्यक्तीच्या उपचाराचा खर्चही त्यांना उचलावा लागेल, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे. लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. देशात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. या कुत्र्यांकडून अनेक ठिकाणी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत.
परिणामी, भटक्या कुत्र्यांना मारण्याबाबत विविध संस्थांनी आदेश दिले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच्या सुनावणीदरम्यान न्या. संजीव खन्ना आणि न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ही महत्त्वपूर्ण सूचना केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तर्कशुद्ध तोडगा काढला पाहिजे, असे न्या. खन्ना म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना जबाब नोंदवण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला निश्चित केली. 2022 सालच्या पहिल्या सहा महिन्यांत 14.5 लाखांहून अधिक लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी भटक्या कुत्र्यांनी माणसांना चावल्याची सर्वाधिक प्रकरणे तामिळनाडूमध्ये नोंदवली आहेत.