

चंदीगड : वृत्तसंस्था पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारतातील पंजाबच्या चंदीगड तसेच मोहाली या शहरांवर दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोहाली (पंजाब) दौरा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पंजाबात अलर्ट जारी करण्यात आला असून, चंदीगड आणि मोहालीत विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बसस्थानकांना लक्ष्य करण्यास दहशतवाद्यांचे प्राधान्य असणार आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात पंजाब सरकारला माहिती दिल्यानंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा काटेकोर करण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी 24 ऑगस्ट रोजी मोहालीत येत आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंजाब पोलिसांनी बसस्थानके, रेल्वेस्थानके आदी गर्दीच्या ठिकाणांवर तपासणी सुरू केली आहे.
– पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चार गँगस्टर्सना अटक केली होती. दीपक मोगा, सन्नी ईसापूर, संदीप सिंग आणि बिपिन जाखड अशी त्यांची नावे आहेत.
– हे चारही जण कॅनडातील अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंट जंटा या गँगस्टर्सच्या संपर्कात होते. चौकशीत या सर्वांनीदिल्ली, मोगासह मोहालीही आमचे लक्ष्य असल्याची कबुली दिली होती.
– या चारही जणांच्या 'टार्गेट किलिंग प्लॅन'सह पाक आयएसआय – खलिस्तानी दहशतवादी – गँगस्टर्स अशी ही अभद्र युती असल्याचेही पोलिसांनी तेव्हाच स्पष्ट केले होते.
पंजाबातील नेते आणि अधिकारी मिळून 10 जण दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा, माजी मंत्री गुरकीरत कोटली, विजयइंदर सिंगला आणि परमिंदर पिंकी यांची नावे या यादीत आहेत. या सर्वांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.