Reasi Terror Network | रियासीचे ३० दहशतवादी पाकिस्तानमध्ये सक्रिय

शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेऊन भारतात दहशतवाद पसरवण्याचा कट
Reasi Terror Network |
Reasi Terror Network | रियासीचे ३० दहशतवादी पाकिस्तानमध्ये सक्रियPudhari file Photo
Published on: 
Updated on: 

जम्मू; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोठी पावले उचलली आहेत. रियासी जिल्ह्यातील तब्बल ३० दहशतवादी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले असून, तिथे ते भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेत असल्याचा धक्कादायक खुलासा जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी बुधवारी केला. हे सर्व दहशतवादी १९९१ ते २००३ या कालावधीत बेपत्ता झाले होते.

हिजबुल मुजाहिद्दीनमार्फत दहशतवादाला खतपाणी

पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी दिलेल्या माहितीनुसार, महोर पोलिस ठाण्याला विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की, महोर आणि चासाना परिसरातील सुमारे ३० दहशतवादी शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेले आहेत. हे सर्वजण सध्या पाकिस्तानात राहून 'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ते सीमेपलीकडून शस्त्रे, दारूगोळा आणि पैसा पुरवत आहेत. याशिवाय, स्थानिक तरुणांना भडकावून आणि त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्याचे कामही हे दहशतवादी करत असल्याचे डीजीपींनी स्पष्ट केले.

दहशतवाद्यांची यादी जाहीर आणि कठोर कारवाई

पोलिसांनी या सर्व ३० दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शादोल येथील मोहम्मद कय्यूम, मोहम्मद सबदार, गुलाम मोहम्मद, गुलाम कादिर, मुश्ताक अहमद, खुशाल हुसैन, अब्दुल मजीद, मोहम्मद रफिक ऊर्फ शब्बीर, शब्बीर अहमद, मंजूर अहमद, मखाना, अलफ दीन, अब्दुल मजीद, गुलाम मोहम्मद उर्फ गामा आणि सिलधार येथील मुश्ताक अहमद यांचा समावेश आहे. तसेच मोहम्मद युसूफ खकमत, मोहम्मद इक्बाल, मोहम्मद अश्रफ, गुलाम मोहम्मद, अब्दुल हमीद नजर उर्फ महमदू, जमाल दीन, तालिब हुसैन, मोहम्मद रफिक, गामी गुज्जर, मोहम्मद रफिक, मोहम्मद कासिम, अब्दुल हमीद, शब्बीर अहमद, मोहम्मद रफिक आणि मोहम्मद अली यांचीही नावे या यादीत आहेत. महोर पोलिसांनी २०२४ मध्ये या सर्व दहशतवाद्यांविरोधात भारतीय न्याय संहिता, स्फोटक पदार्थ कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

२७ कनालहून अधिक जमीन जप्त

सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांना बळ देण्यासाठी यापैकी पाच दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील आपल्या मालकीची जमीन विकण्याच्या प्रयत्नात होते. जमीन विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादासाठी केला जाणार होता. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत या पाच दहशतवाद्यांची २७ कनालहून अधिक जमीन जप्त केली असून, दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

१. १९९१ ते २००३ दरम्यान बेपत्ता झालेले रियासी जिल्ह्यातील ३० दहशतवादी पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेत असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली.

२. हे सर्व दहशतवादी सध्या हिजबुल मुजाहिद्दिन संघटनेसाठी काम करत असून काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाकडे वळवत आहेत.

३. महोर आणि चासाना भागातील या दहशतवाद्यांविरोधात २०२४ मध्ये यूएपीए आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४. दहशतवादी कारवायांना निधी पुरवण्यासाठी जमीन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांची २७ कनालहून अधिक जमीन पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.