

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maha Kumbh 2025 | महाकुंभमेळ्यात प्रयागराजच्या संगम तीरावर मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृत स्नान सोहळ्यासाठी कोट्यवधी भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२९) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली होती. या घटनेतील मृतांमधील 25 जणांची ओळख पटली आहे.
प्रयागराजच्या संगम तीरावर मौनी अमावस्येच्या निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान जागेसाठी धावपळ करत असताना मंगळवारी (दि.२८) मध्यरात्री दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरूवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र, प्रयागराज महाकुंभातील दुर्घटनेनंतर त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला. प्रयागराजमध्ये अजूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनी प्रयागराज येथील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.