Pudhari Motivational : Start Up Story : करिअरच्या वेगळ्या वाटा चोखंदळणारी मणिपूरची बिजयशांती टोंगब्राम; पंतप्रधान मोदी यांनीही केलं कौतुक!

कमळाच्या देठापासून धागा बनवण्याचा उद्योग
कमळाच्या देठापासून धागा बनवण्याचा उद्योग
Published on
Updated on

[visual_portfolio id="282455"]

मणिपूर हे आपल्या इशान्य भारतातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं राज्य. हो सेव्हन सिस्टर्सपैकी एक! तसं तर तिकडची संस्कृती, जीवनमान याबाबत बाकीच्या भारतीयांना मोठे कुतूहल असते. पर्यटनासाठी एक सुंदर ठिकाण म्हणून ही ईशान्य भारतातील राज्ये पर्यटन प्रेमींमध्ये आकर्षणाचे केंद्र असतात. मात्र, मोठी नैसर्गिक संपदा असूनही कमी पायाभूत सोयी-सुविधांच्या कमतरतेमुळे आर्थिक दृष्ट्या रोजगाराच्या संधी तशा कमीच! अशा ठिकाणी तिने मोठ्या जिद्दीने एक आगळा वेगळा व्यवसाय उभारून फक्त स्वतःसाठीच नव्हे तर परिसरातील महिलांसाठी देखील रोजगाराची संधी मिळवून दिली. इतकेच नव्हे तिच्या या अनोख्या स्टार्ट अपने संपूर्ण देशाला एक नवीन ओळख मिळवून दिली. कोण आहे ही तरुणी काय आहे तिचे स्टार्ट अप… काय आहे वेगळेपण चला तिच्या पासून प्रेरणा घेऊया…

पदवीनंतर पुढे काय… या प्रश्‍नाचे उत्तर तिनेच शोधले…

बिजयशांती थांगा टोंगब्राम बिसेनपूर जिल्ह्यात राहणारी 27 वर्षीय तरुणी. मध्यम वर्गीय कुटुंबातील या तरुणीने मोठ्या कष्टाने वनस्पती शास्त्र (बॉटनी) या विषयात पदवी घेतली. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने या विषयात आणखी पदव्यूत्तर शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे फक्त पदवीच्या आधारावर चांगली नोकरी मिळणे तसे कठीणच; मग आता पुढे काय करायचे हा प्रश्न तिलाही पडला होता. थोडक्यात हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ती देखील एक सुशिक्षित बेरोजगारच होती, असे आपण म्हणू शकतो. मात्र, या परिस्थितीचा तिने गवगवा केला नाही.

तुमच्यात काही-तरी करण्याची जिद्द, चिकाटी, परिश्रम घ्यायची तयारी असेल तर कोणत्याही कामात तुम्ही यश खेचून आणू शकता. बिजयशांतीने वनस्पतीशास्त्रात पदवी घेतल्याने आपल्या परिसरातील वनस्पती त्यांचे उपयोग अशा सर्वच गोष्टींविषयी तिला माहित होते. तिने आपल्याच गावात राहून काही करता येईल का याचा अभ्यास केला. मणिपूरच्या प्रसिद्ध लोकतक झील जवळ थंगा टोंगब्रम भागातील शांतीचे गाव. लोकतक झीलमध्ये मोठ्या मात्रेत कमळाचे फूल उगतात. या कमळाच्या फुलांचे तिला आकर्षण. सुरुवातीला या कमळाच्या फुलांची शेती करून कमळ कृषि पर्यटन करण्याचा विचार होता. मात्र, यासाठी खूप खर्च येत होता. त्यामुळे ते तिला करता आले नाही. पण कमळाबाबत तिला आकर्षण काही सुटले नाही.

स्वयंरोजगाराकडे वाटचाल…

इंटरनेटच्या माध्यमातून कमळाच्या फुलांपासून काय-काय करू शकतो याचा अभ्यास सुरू केला. पदवीच्या वेळेत ज्या शिक्षकांनी तिला शिकवले त्यांचेही मार्गदर्शन घेतले. हा अभ्यास करतानाच तिला कमळाच्या देठापासून धागा तयार होतो आणि या धाग्यापासून विणलेल्या कापडाला चांगली मागणी आहे. तसेच आतापर्यंत फक्त म्यानमारमध्येच हा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. हे ही तिला कळाले.
म्यानमार हे तसे मणिपूरपासून जवळच तिने याचे प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. तिच्या शिक्षकांनी यामध्येच करिअर घडवून याला उपजीविकेचे साधन बनवण्याचा तिला सल्ला दिला. त्यानंतर 2017-2018 मध्ये तिने हे काम सुरू केले, असे तीने एका मुलाखतीत सांगितले. कमळ फूल उमळून गेल्यानंतर त्यांची देठं तोडून होडीत घालून घरी आणायची. त्याच्या चिकाची सुखाईकरून चरख्यावर कातायचे त्यानंतर तयार झालेल्या धाग्यांपासून हातमागावर हे कापड विणायचे, इतक्या मेहनतीनंतर या कापडापासून एक स्कार्फ बनवायला एक महिना लागतो. त्यामुळे हे कापड महाग आहे..

60 महिलांना मिळाला रोजगार

मोठ्या कष्टाने तिने 2017-18 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तिच्या परिसरातील 60 महिलांना रोजगार मिळाला. घरात बसून या महिलांच्या हाताला काम मिळाले. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात याच कापडापासून तिने मास्क बनवले. जे आरोग्यासाठी चांगले आहेत.

तिच्या या कामामुळे फक्त एक उद्योगच उभा राहिला नाही तर आंतरराष्ट्रीय वस्त्र उद्योगात कमळाच्या देठापासून कापड तयार करण्याच्या उद्योगात आता भारताचेही नाव आले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांच्या 'मन की बात' मधून या युवतीचे कौतुक केल्यावाचून राहावले नाही. पीएम मोदी यांनी तिचा उल्लेख करत म्हटले, बिजयशांती यांच्या नवीन विचार आणि कल्पनेमुळे फक्त कमळाच्या शेतीतच नव्हे तर वस्त्रोद्योगात देखील नवीन मार्ग खुले केले आहेत. त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनीही तिचे ट्विट करून याबाबत अभिनंदन केले.

आता ही बिजयशांति कमळाच्या या देठांपासून फक्त कापडच नव्हे तर ज्वेलरी आणि अन्य औषधी उत्पादने बनवण्याचा देखील विचार करत आहे. तिला परिसरातील कमळाच्या फुलांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा दांडगा अभ्यास त्याच्या उपयोगाने औषधी उत्पादने बनवता येतात का याचा आता ती अभ्यास करत आहे.

देशात नोक-या नाही खूप बेरोजगारी आहे. अशा प्रकारे फक्त सरकारवर ताशेरे ओढत बसण्यापेक्षा आपण करिअरच्या वेगळ्या वाटा चोखंदळायला हव्या. आव्हानांचे रुपांतर संधीत करायला हवे आणि संधीचे सोने करता यायला हवे. अगदी मणिपूरच्या या सुंदर तरुणीसारखे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news