

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केंद्र सरकारने लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाशी सल्लामसलत करून या भागातील २८ प्रमुख भौगोलिक ठिकाणे व वैशिष्ट्यांच्या नावांचे प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. ही सर्व नावे आता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अधिकृत नकाशांवर अधिकृतपणे नोंदवली जातील. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली असून भौगोलिक अचूकता, प्रशासकीय सुसूत्रता आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या ठिकाणांची अचूक ओळख निश्चित करून नागरिकांत त्यांच्या भौगोलिक महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे, हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे. प्रमाणित नावांच्या अभावामुळे पूर्वी नकाशे व अधिकृत कागदपत्रांत एकाच ठिकाणाची वेगवेगळी स्पेलिंग्ज किंवा नावे आढळत होती. नव्या निर्णयामुळे अशा सर्व विसंगती संपुष्टात येतील.
प्रशासकीय, सामरिक दृष्टिकोनातून महत्त्व
सामरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या लडाख सीमेवर भौगोलिक संदर्भांची अचूकता अत्यंत कळीची ठरते. विशेषतः, प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या नजीक असलेल्या गोगरा व हॉट स्प्रिंगसारख्या भागांचे अचूक नामकरण नकाशांवर आल्याने सुरक्षा दलांना सीमा व्यवस्थापनात मोठा फायदा होईल. सरकारी यंत्रणा, नकाशाकार व प्रशासकीय विभागांसाठी हा संदर्भ एकसंध माहितीचा आधार ठरेल.
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा संगम
या नामकरणात लडाखच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडलेली विविध शिखरे, पर्वतरांगा, खिंडी, हिमनद्या, दऱ्या, नद्या, तलाव व जमिनीच्या भागांचा समावेश आहे.
१) शिखरे : अतिशा गिरी, कनिष्क पीक, मार्तंड गिरी, जोरावर पीक, रिंचेन झांगपो शाक्यश्री गिरी, मार्पा लोत्सावा री, मिलारेपा कांग्री, शिव री आणि महेश्वर री. (बौद्ध धर्मगुरू व भगवान शिवाशी संबंधित नावांचा समावेश).
२) पर्वत : कारुण पीर, द्राक कारपो व जोलमोर
३) खिंडी : चापचिंगल व शचमिर्क.
४) हिमनद्या : पारपिक व स्कमरी.
५) जलस्रोत : श्कोर्गा व्हॅली, यांगपा नदी, गुरू रिंपोचे तलाव व हॉट स्प्रिंग.
६) इतर भूभाग : ब्रांग्सा, कुकसेल, देहरा कंपास, गोगरा, कुमारयान पॉईंट, पंगलुंग व शामल लुंगपा.
१) लडाखमधील शिखरे, खिंडी, हिमनद्या आणि नद्यांसह २८ ठिकाणांची अधिकृत नावे आता नकाशांवर निश्चित केली गेली आहेत.
२) बौद्ध तत्त्वज्ञान, भारतीय परंपरा व स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब नवीन नामांकनात दिसते.
३) गोगरा व हॉट स्प्रिंगसारख्या संवेदनशील सीमाभागातील नोंदींमुळे सामरिक व नकाशाविषयक स्पष्टता वाढणार आहे.
४) स्पेलिंग्जमधील तफावत दूर होऊन प्रशासकीय, लष्करी व महसूल नोंदींत एकवाक्यता येईल.