

नवी दिल्ली : १८ वर्षाखालील मुलांना परवान्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी देणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये १८ वर्षांखालील ९ हजार ४८९ मुले रस्ते अपघातात मरण पावली, याचा अर्थ देशात दररोज २६ मुलांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात अपघातात जीव गमावलेल्या एकूण लोकांपैकी हे प्रमाण ५.४९% आहे. यांपैकी २ हजार ५३७ मुले वाहन चालवताना (परवाना नसताना) मरण पावली, म्हणजे दररोज सुमारे ७ 'अल्पवयीन ड्रायव्हर्स'ने आपला जीव गमावला. तर अपघातांमध्ये ४ हजार २४२ मुले प्रवासी म्हणून मरण पावली, तर २ हजार २३२ मुले पायी चालताना रस्त्यावर चिरडली गेली.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या भारतातील रस्ते अपघात-२०२३ अहवालासाठी गोळा केलेल्या आकडेवारीत हे चित्र समोर आले आहे. हा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये हेल्मेट न घातल्याने ५४ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये रस्ते अपघात ४.२ टक्क्यांनी आणि मृत्यू २.६ टक्क्यांनी वाढले आहेत. २०२३ या वर्षातील रस्ते अपघातांचे वयानुसार पाहिले तर सर्वाधिक ६६.४ टक्के मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. तर एकूण मृत्यूंपैकी ५०.५ टक्के हे ३५ वर्षाखालील लोक आहेत. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३१.५ टक्के शहरी आणि ६८.५ टक्के ग्रामीण आहेत. यामध्ये ८५.८ टक्के पुरुष आणि १४.२ टक्के महिलांचा समावेश आहे.
देशात सर्वाधिक १३.७ टक्के मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आणि तामिळनाडू सलग सहाव्या वर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. तर महाराष्ट्रात ३५ हजार २४३ रस्ते अपघाताच्या घटनांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये १५ हजार ३६६ जणांना जीव गमवावा लागला आहे. रस्ते अपघातातील एकूण मृत्यूच्या ८.९ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि तामिनाडूनंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२०२३ मध्ये, ३३ हजार ८२७ लोक ज्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा लोकांचा देशभरात रस्ते अपघातात मृत्यू झाला. एकूण मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण ७ टक्के आहे. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सरकारी दाव्यांदरम्यान, खड्ड्यांमुळे देशात वर्षभरात २ हजार १६१ लोकांनी अपघातात आपला जीव गमावला, जो २०२२ (१ हजार ८५६) पेक्षा १६.४ टक्के अधिक आहे.
ओव्हरलोड वाहनांमुळे २७ हजार ८१० अपघात झाले असून यामध्ये १२ हजार १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२३ या वर्षभरात देशात ६८ हजार ७८३ हिट अँड रनच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ३१ हजार २०९ जणांनी जीव गमवला आहे. तर ५४ हजार ५७४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू दिल्लीत १ हजार ४५७ झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर बेंगळुरु ९१५ आणि जयपूर ८४९ मृत्यूसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२०२२ च्या तुलनेत रस्ते अपघातात बालकांच्या मृत्यूची संख्या कमी आहे. २०२२ मध्ये ९ हजार ५२८ मुलांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. देशात अजूनही दर तासाला सरासरी ५५ रस्ते अपघात होत आहेत. यामध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.