

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळील इंदिरेड्डी नगर येथे पहाटे 6.15 वाजता एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणार्या तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तंदूर-हैदराबाद बसला जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात 24 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. ट्रकवर खडीचे ओझे असल्याने अपघातस्थळी सर्वत्र खडी पसरली आणि अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले. बचाव कार्यासाठी तातडीने अर्थमूव्हर्सचा वापर करण्यात आला.
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, तातडीने अपघातस्थळी पोहोचून सर्वतोपरी मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी गांधी आणि ओस्मानिया रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांनी सर्व विभागांना सतर्क करत सचिवालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. वाहतूक मंत्री पोन्नम प्रभाकर यांनीही अधिकार्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.