धक्कादायक! आईने मित्राला मुलीवर बलात्कार करायला लावले अन् ४ वर्षांत ८ वेळा स्त्रीबीज विकले | पुढारी

धक्कादायक! आईने मित्राला मुलीवर बलात्कार करायला लावले अन् ४ वर्षांत ८ वेळा स्त्रीबीज विकले

सालेम: वृत्तसंस्था

तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एका आईने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला लावला आणि नंतर तिच्या स्त्रीबीजांचा सौदा केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. हे प्रकरण सालेम जिल्ह्यातील आहे.

या अल्पवयीन मुलीवर आधी तिच्या आईच्या मित्राने बलात्कार केला आणि नंतर तिचे स्त्रीबीज हॉस्पिटलमध्ये विकल्याचे तपासात समोर आले आहे. बलात्कार पीडितेची आई आणि तिच्या मित्राच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

या मुलीवर बलात्कार करून तिचे स्त्रीबीज विकण्याचा प्रकार 2017 पासून सुरू होता. त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. गेल्या 4 वर्षांत 8 पेक्षा जास्त वेळा तिच्या गर्भाचा सौदा करण्यात आला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर राज्यातील आरोग्य अधिकार्‍यांनी मुलीशी बोलून समुपदेशन सुरू केले आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून कारवाई

पीडितेचे आई-वडील 10 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. त्यानंतर आई आपल्या मित्रासोबत राहात होती. अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेली ही मुलगी मे महिन्यात घरातून पळून आपल्या मैत्रिणीकडे गेली. मुलीने हा प्रकार एका मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर तिच्या मैत्रिणी आणि काही नातेवाईकांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची आई आणि तिच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चौकशीसाठी नेमली समिती

राज्याच्या आरोग्य सचिवांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत आयपीसीच्या कलम 420, 464, 41, 506 सह पॉक्सो कायदा, आधारचा गैरवापर यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंध्यत्वाच्या वाढत्या प्रकरांच्या द़ृष्टिकोनातूनही तपास केला जाणार आहे. नव्याने उजेडात आलेल्या या प्रकरणात काही डॉक्टर आणि दलालांची ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे.

20 हजारांत विकत होते स्त्रीबीज

पीडितेने सांगितले की, प्रत्येक वेळी ती गरोदर राहिल्यानंतर तिला स्त्रीबीज विकून रुग्णालयातून 20 हजार रुपये मिळत असत. यातील पाच हजार रुपये एक महिला कमिशन म्हणून घ्यायची आणि उर्वरित रक्कम आई आणि तिचा मित्र घ्यायचा. असे वर्षातून दोनदा केले जात होते. आईच तिच्या मित्राला पोटच्या मुलीवर बलात्कार करायला लावायची आणि गरोदर असताना तिचे स्त्रीबीज रुग्णालयामध्ये विकायची.

Back to top button