नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा ; कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे अनेक नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचमुळे हेल्पलाईन नंबरवर येणार्या कॉल्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गतवर्षी दिल्लीतील स्नेही फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल माबूत यांनी कोरोनाशी निगडीत मानसिक आरोग्याबाबतची प्रकरणे हाताळण्यासाठी एक मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाईन सुरू केली होती. त्यांच्या मते कोरोनामुळे लोकांमध्ये भीती, दुःख, पश्चाताप, लाचारी वाढली आहे. या संसर्गाचा धसका आणि धक्का लोकांनी घेतला आहे. त्यातून लोकांवरील तणाव वाढला आहे. ताण वाढल्याची अनेक प्रकरणे आहेत.
बहुतांश कॉल्स हे कोरोनामुळे आर्थिक अडचणीतून लाचारीची स्थिती निर्माण झालेल्यांचे आहेत. यात युवकांचाही समावेश आहे. घराबाहेर पडल्याने संक्रमित होऊन घरातील लोकही व संक्रमित झालेले युवकही मोठ्या संख्येने फोन करत आहेत.
पैसे असूनही रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर किंवा रुग्णालयात बेडची व्यवस्था करू न शकलेल्या अनेक श्रीमंतांचेही कॉल्स येत आहेत. हे सर्व दहशतीत आहेत. त्यांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. अनेक कॉल्स उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारच्या ग्रामीण भागातून येत आहेत. कॉलवरून कळते की गावातील आणि शहरातील स्थिती काय आहे. यातून लोकांना निद्रानाशाचे विकार जडले आहेत, असे अब्दुल माबूत यांनी सांगितले.
आत्महत्येचा विचार करणारे 7 टक्केकॉलर
गेल्या वर्षीपासून ही हेल्पलाईन कोरोनाशी संबंधित मानसिक अडचणींतून निपटण्यासाठी लोकांची मदत करत आहे. सात प्रशिक्षित लोकांचे पथक रोज 40 लोकांना फोनवरून मार्गदर्शन करतात. आतापर्यंत सात हजार लोकांना मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेत कॉल्सची संख्या वाढली आहे. या कॉल्समध्ये आत्महत्येचा विचार करणार्यांचे प्रमाण सात टक्के इतके आहे, जे गतवर्षी 1 टक्का इतके होते.
दिल्लीतील संस्थेत दररोज 40 कॉल्स
आतापर्यंत सात हजार नागरिकांचे समुपदेशन
अनेकांना जडला निद्रानाशाचा विकार