स्विस बँकेतील १३ वर्षांचा विक्रम मोडित! भारतीयांचे गेल्यावर्षी तब्बल २० हजार ७०० कोटी बँकेत जमा! | पुढारी

स्विस बँकेतील १३ वर्षांचा विक्रम मोडित! भारतीयांचे गेल्यावर्षी तब्बल २० हजार ७०० कोटी बँकेत जमा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम २० हजार कोटींच्या पुढे गेली आहे. स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँक स्विस नॅशनल बँकने (एसएनबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांचा 2.55 अब्ज स्विस फ्रँक (20,700 कोटींपेक्षा जास्त रुपये) जमा आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की खासगी बँकांच्या खात्यात जमा झालेल्या पैशात घट झाली आहे. त्याचबरोबर सिक्युरिटीज, कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून पूर्वीपेक्षा जास्त पैसे जमा केले गेले आहेत.

एसएनबीच्या आकडेवारीनुसार, 2019 अखेरपर्यंत भारतीयांच्या ठेवींचा आकडा 899 दशलक्ष स्विस फ्रँक (6,625 कोटी रुपये) होता. 2019 ची आकडेवारी दोन वर्षांच्या निचांकावरून उचांकाकडे जाऊन13 वर्षांत बँकांमध्ये भारतीय ठेवींनी विक्रम मोडित काढला आहे. 

बँकेच्या म्हणण्यानुसार 2006 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5 अब्ज स्विस फ्रँकची विक्रमी नोंद गाठली होती, परंतु त्यानंतर 2011, 13 आणि 2017 वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नव्हता. परंतु 2020 ठेवींचे सर्व आकडे मागे टाकले. सन 2020मध्ये, जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे 4000 हजार कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत 3100 कोटी रुपये जमा झाले.

एकूणच स्विस बँकांमध्ये वेगवेगळ्या देशांतील ग्राहकांच्या ठेवी 2020 मध्ये वाढून सुमारे 2000 अब्ज स्विस फ्रँकपर्यंत पोहोचल्या आहेत. यापैकी 600 अब्ज स्विस फ्रँक ही परदेशी ग्राहकांकडील ठेवी आहेत. या यादीमध्ये ब्रिटन आघाडीवर आहे. तेथील नागरिकांकडे स्विस बँकांमध्ये 377 अब्ज स्विस फ्रँक आहेत. त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक आहे (152 अब्ज स्विस फ्रँक).

स्विस बँकेच्या ठेवींच्या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये वेस्ट इंडिज, फ्रान्स, हाँगकाँग, जर्मनी, सिंगापूर, लक्झेंबर्ग, केमन बेटे आणि बहामास यांचा समावेश आहे. या यादीत भारत 51 व्या क्रमांकावर आहे आणि न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, हंगेरी, मॉरिशस, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांपेक्षा पुढे आहे. ब्रिक्स देशांपैकी भारत चीन आणि रशियाच्या खाली आहे तर दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या पुढे आहे.

Back to top button