

पुढारी ऑनलाईन डेस्क : Vadodara Accident News : गुजरातमधील वडोदरा शहरात अपघाताची दुर्दैवी घटना घडली. एका २० वर्षीय तरुणाच्या कारने पाच जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर सर्व जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास करेलीबाग परिसरात घडली. ज्या कारने पाच जणांना चिरडले त्याचा चालक तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या घटनेत एका भरधाव कारने अनेक दुचाकी वाहनांना धडक दिली. ही कार २० वर्षीय कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी रक्षित चौरसिया (Rakshit Chaurasiya) चालवत होता. याबाबत पोलीस उपायुक्त पन्ना मोमाया यांनी सांगितले, "हा अपघात रात्री १२:३० च्या सुमारास करेलीबाग परिसरातील मुक्तानंद क्रॉस रोडजवळ झाला." पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून कारमधील अन्य व्यक्तीचीही ओळख पटली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कारने पाच जणांना चिरडणाऱ्या २० वर्षीय तरुणाने तो मद्यधुंद अवस्थेत होता, ही गोष्ट नाकारली. इमर्जन्सी एअरबॅगमुळे आपल्याला नीट पाहाता आले नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा त्याने केला. त्याने भरधाव कार चालवल्याचाही आरोप फेटाळला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, रक्षित चौरसिया याने सांगितले की, "मी ज्या रस्त्यावरून गाडी चालवत होतो त्यावर एक समोर खड्डा आला. तो खड्डा चुकवून मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान माझी कार समोरून येणाऱ्या स्कूटरला धडकली. यादरम्यान इमर्जन्सी एअरबॅग उघडली, तेव्हा मला काही नीट दिसले नाही. ज्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला."
या घटनेचा अपघातस्थळावरील एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यात मद्यधुंद अवस्थेतील रक्षित अपघातानंतर गाडीतून बाहेर पडतो आणि 'आणखी एक राऊंड', 'आणखी एक राऊंड' असे ओरडताना दिसतो. तर तेथील जवळचे लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. घटनास्थळी जखमी लोक जमिनीवर पडलेले दिसतात. या व्हिडिओत कार भरधाव असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्या तरुणाने माध्यमांशी बोलताना, त्याने केलेल्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तो भरधाव कार चालवत असल्याचेही नाकारले.
"कारचा वेग ताशी केवळ ५० किलोमीटर होता. मला समोरून येणारी केवळ स्कूटर आणि एक कार दिसली. रस्त्याच्या कडेला मला कोणीही चालताना दिसून आले नाही," असे रक्षित चौरसिया याने माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याच्या चेहऱ्याला सूज आली असून त्याला अनेक दुखापती झाल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, "सदर कार रक्षित चौरसियाच्या मित्राची आहे. अपघाताच्यावेळी तोही रक्षितसोबत कारमध्ये होता." या घटनेतील आरोपी रक्षित चौरसिया हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी आहे. तो वडोदरा येथील विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे.