मोदींकडून तिरंदाज प्रवीणला शाबासकी | पुढारी | पुढारी

मोदींकडून तिरंदाज प्रवीणला शाबासकी | पुढारी

फलटण : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये रविवारी सातारा जिल्ह्यातील धनुर्विद्या खेळाडू प्रवीण रमेश जाधव याचे भरभरून कौतुक केले. सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण टोकियो ऑलिम्पिकमध्ये धनुर्विद्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदनही केले. 

‘प्रवीण ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आई-वडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. फलटण तालुक्याच्या द़ृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीणचं  कौतुक केल्यामुळे मोलमजुरी करणार्‍या त्याच्या आई-वडिलांचा ऊर अभिमानानं भरून आला. 

जपानमधील टोकियो येथे 23 जुलैपासून ऑलिम्पिक  सुरू होणार आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये रविवारी ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रवीणचे कौतुक केले.  

प्रवीणला अगदी लहानपणापासून आर्चरीची आवड होती. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून तो आर्चरी या खेळ प्रकार शिकत होता. पुढे  औरंगाबादनंतर पुणे व दिल्ली या ठिकाणी त्याने प्रशिक्षण घेतले. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. या शाळेतील त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्याकडील कौशल्य ओळखून त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर प्रवीण अमरावती येथे आर्चरीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल गेला. नेमबाजीतील कौशल्यावर त्याची 2015 साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. यातूनच पुढे सन 2016 च्या आर्चरी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात त्याला संधी मिळाली आणि आता टोकियो येथे होत असलेल्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकाचा अचूक वेध घेण्यासाठी प्रवीण सज्ज झाला आहे.

दरम्यान, प्रवीण जाधवच्या निवडीबद्दल त्याला फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त होत असून, त्याला क्रीडा क्षेत्राकडे प्रवृत्त करणारे शिक्षक विकास भुजबळ व सौ. शुभांगी भुजबळ यांचेही अभिनंदन होत आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी


तुम्ही आमच्या प्रवीण जाधवबद्दल ऐकले तर तुम्हाला जाणवेल की, किती कठीण संघर्षानंतर ते इथं पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सरडे या फलटण तालुक्यातील गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आई-वडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आई-वडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘मी आज जे काही आहे ते तिरंदाजीमुळे आहे. मी जर खेळाकडे वळलो नसतो तर कदाचित आज मी कुठेतरी मजूर म्हणून काम करत असतो. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे.
– प्रवीण जाधव, 

ऑलिम्पिकपटू

Back to top button