“निवडणुका नाहीत, उगाच कशाला पावसात भिजा”, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला | पुढारी

"निवडणुका नाहीत, उगाच कशाला पावसात भिजा", राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

पुणे, पुढारी ऑनलाईन : मनसे प्रमुख राज यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये घुसून देणार नाही, अशी धमकी दिली. त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये शक्ती प्रदर्शनदेखील केले होते. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत ठाकरेंचा अयोध्या दौरा अचानक रद्द करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. मनसेवर विरोधकांकडून टीका होऊ लागली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होत राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यात सभा आयोजित केली होती. या सभेत राज ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. आजच्या सभेत राज ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे…

एसपी काॅलेजने सभा घेण्यासाठी मैदान नकार दिला. आता आम्हाला मैदान नाही तर कुणालाच नाही, अशी धमकी वजा प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.

बदललेल्या वातावरणामुळे पावसाची शक्यता होती. त्यामुळे आजची सभा हाॅलमध्ये घ्यावी असा विचार झाला. आणि तसंही सध्या निवडणुका नाहीत तर उगाच कशाला पावसात भिजत भाषण घ्या, असा टोमणाही राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.

माझ्या अयोध्या दौऱ्याची तारीख सर्वांना खुपली. त्यांनीच अयोध्या दौऱ्या दरम्यान सापळा रचला आहे. या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली आहे, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केली.

युपीतील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “मी जर आता अयोध्या दौऱ्यावर गेलो, तर माझ्या कार्यकर्त्यांना सडवलं गेलं असतं. त्यांना जेलमध्ये घातलं गेलं असतं. ऐन निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यकर्त्यांना गमवायचं नाही.”

गुजरातमधून हजारो परप्रांतियांना हकललं गेलं होतं, त्यासंदर्भात कोणाला माफी मागायला लावणार आहात? माफी मागायला गेली १५ वर्षे झोपले होता का, अशी प्रतिक्रियाही त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या भूमिकेवर राज ठाकरेंनी दिली.

शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, “यांनी आपलं हिंदूत्व झोंबलं गेलं आहे. बाकी काही नाही. मातोश्रीवर हनुमानचालिसा वाचायला आलात, मातोश्री काय मशीद आहे का?”, असा टोला राणा दाम्पत्याला राज ठाकरेंनी दिला.

हनुमानचालिसावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये इतका राडा झाला, त्यानंतर हे लडाखमध्ये एकत्र दिसले. या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे. त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वाॅशिंग पावडर आहे का?”, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, “औरंगाबाद नामांतरावर यु टर्न घेणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? शिवसेनेच्या राजकारणामुळे निझामाच्या औलादी इथं वळवळू लागल्या आहेत. कारण, शिवसेनेला सत्ता महत्वाची वाटते.”

एमआयएमवर टीका करताना म्हणाले की, “एमआयएमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? अफजल खानाच्या मशिदीचा किती विस्तार झालाय, ते बघा”, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली.

“परीक्षेच्या सगळ्या जाहिराती परप्रातांत कशा येतात? राज ठाकरे आंदोलन कधीच अर्धवट सोडत नाही. टोलनाक्यासंदर्भातील आंदोलनात ७० टोलनाके बंद झाले. पाकिस्तानी कलाकरांना हुसकावून लावले. आम्ही भोंग्यांचा विषय काढला, तर सकाळचा आवाज बंद झाला”, अशीही माहिती राज ठाकरे यांनी दिली.

Back to top button