लोकमान्य टिळकांनी स्वराज्याच्या लढ्याला चालना दिली | पुढारी

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याच्या लढ्याला चालना दिली

वारकरी संप्रदाय आणि संतांचे विचार, यांचा दोन प्रकारे परामर्श घेऊ शकतो. पहिला परामर्श म्हणजे, शुद्ध पारमार्थिक आणि आध्यात्मिक रूपाने करू शकतो. संप्रदायातले लोक ते पिढ्यान्पिढ्या करीत आलेले आहेत. दुसरा परामर्श म्हणजे, तुमचा परमार्थ, आध्यात्मिक म्हणजे जे जे काही आहे, ते शेवटी विशिष्ट प्रकारच्या सामाजिक, राजकीय चौकटीमध्ये असते. आध्यात्मिक काय करतं, तर या मर्यादा वैयक्तिक स्तरावर ओलांडण्याचा प्रयत्न करतं. हे एक प्रकारचं आध्यात्मिकच आहे. न् वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती। मन्मना नाही क्षिती। तो त्याच्या आत्म्याचा निर्धार आहे की, ठीके असू देत मी नाही हे बंधन पाळणार…हे आध्यात्मिक झालं. आध्यात्मिक हे एकट्यापुरतं असतं. शेवटी तुम्हाला जे काही करायचं आहे ते सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चौकटीत करावं लागतं. त्यात ते करताना अधिकाधिक लोक कसे येतील, त्यांना कसा लाभ होईल, हे बघावं लागतं. तर याला श्रीमद् भगवद‍्गीतेत लोकसंग्रह म्हटलेलं आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये त्याचं खूप विस्तारानं विवेचन केलेलं आहे; पण लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘गीतारहस्य’मध्ये हा मुख्य भाग बनवला आहे. त्यात लोकसंग्रह हा मुख्य विषय आहे. वैयक्तिक कल्याणापेक्षा सगळ्या सृष्टीचं कल्याण हे महत्त्वाचं मानलं पाहिजे, असा तो विचार होता. हे ज्यांच्या लक्षात आलं, ती मंडळी अध्यात्म. त्याचं परमार्थ करता करता इकडंसुद्धा त्याचं लक्ष गेलं. काही बाबतीत त्यांनी योगदान केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य लढ्याला चालना दिली. अखिल भारतीय पातळीवर पहिलं नेतृत्व जे उभं राहिलं असेल ते म्हणजे टिळक. त्यांच्या अगोदर कोणीही माणूस संपूर्ण भारताचा नेता नव्हता. संपूर्ण भारतात मान्यता मिळालेले पहिले नेते म्हणजे टिळक. ते संस्कृतचे पंडित होते. भगवद‍्गीतेचं तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या राजकारणाचं तत्त्वज्ञान मानलं होतं. माझं संपूर्ण राजकारण तुम्हाला ‘गीतारहस्य’मध्ये मिळेल, असं त्यांनी सांगितलं. राजकारण आणि अध्यात्म, यामध्ये ते विसंगती मानत नव्हते. टिळकांना यामध्ये मदत कोणी केली तर दा. न. शिखरे नावाच्या गांधीवादी लेखकानं. ते आधी टिळकांचे अनुयायी होते. मग, गांधीजींचे अनुयायी झाले. त्यांनी गेली आठ वर्षं हे एक नाटक लिहिलं. त्या काळात त्या नाटकाचे प्रयोग झाले. त्यावर बंदीही आली होती. नंतर ती उठली. दा. न. शिखरे यांची त्या वेळच्या राजकारणावर ‘थोरली आई’ नावाची कादंबरीही आहे. गेली आठ वर्षं म्हणजे कोणती आठ वर्षं… तर लोकमान्य टिळकांना रँडच्या हत्येमध्ये ओवलं होतं. त्यांना शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगली; पण लक्षात आलं की, त्यात त्यांचा कोणताच हात नव्हता. सरकारनं त्यांना सोडलं. तिथंपासून तर मंडालेच्या तुरुंगात जाईपर्यंत हीच ती मधली आठ वर्षं आहेत. त्यात दा. न. शिखरे होतेच सोबतीला. ते ‘केसरी’मध्ये काम करायचे. त्यांनी या आठ वर्षांत काय दाखवलेलं आहे तर टिळकांची आणि वारकरी संप्रदायाची कशी जवळीक होती, हे त्यांनी दाखवलं. ही जवळीक मुख्यत्वे करून ह.भ.प विष्णू नरसिंह जोग महाराज यांच्यामुळे झाली. त्यांना कुठल्याही परंपरेची, दिंडीची किंवा फडाची पार्श्‍वभूमी नव्हती. ते स्वयंभू होते. त्यांना वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान पटलं. त्यांना वाटलं, आपण वारकरी व्हावं. वारकरी व्हायचं म्हणजे काय करायचं? तर साधारणपणे जो आधीच वारकरी आहे त्यांच्याकडे तुम्ही जायचं आणि त्यांना सांगायचं की, माझ्या गळ्यात माळ घाला. माळ घातली की दीक्षा झाली. तो वारकरी झाला. मग, ज्येष्ठ वारकरी ज्ञानेश्‍वरी किंवा तुकाराम गाथा आणतात आणि ते वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, आचार काय आहे, हे सगळं सांगतात.

त्यातला मुख्य मुद्दा तुम्ही कोणती वारी करणार? आषाढी वारी पत्करणार की कार्तिकी वारी. मग वारकरी आपल्या सोयीप्रमाणे एखाद्या वारीची निवड करतात. मग, हे सर्व झाल्यावर त्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घातली जाते. ज्येष्ठ वारकरी त्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घालतात. तेव्हा ती व्यक्ती वारकरी होते. जोग महाराजांना वाटले की, संत ज्ञानेश्‍वर महाराज हेच आपले गुरू आहेत. मग, कुठल्या दुसर्‍या कोणाकडून माळ घालून घेण्यापेक्षा जोग महाराज सरळ आळंदीला गेले. त्यांनी हातात तुळशीची माळ घेतली ती ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर ठेवली आणि ती आपल्या गळ्यात घातली. तेव्हा ते वारकरी बनले. त्यांच्यात एक प्रतिभा होती. त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायात घालवलं. ते निःस्पृह कीर्तनकार होते. त्या काळी ज्ञानेश्‍वरीचा अर्थ सांगणारे लोक कोण होते, ते म्हणजे नाना महाराज साखरे. ते काय करायचे, वेदांताच्या अंगानं संतांच्या वचनांचा अर्थ लावायचे आणि ती एक परंपरा वारकरी संप्रदायात आहे. तो अर्थ लावण्यासाठी आधी आपल्याला वेदांत शिकला पाहिजे. ते कसं शिकायचं, त्यासाठी सगळे संस्कृत ग्रंथ आहेत. त्यांनी यावर एक मार्ग काढला. त्यांनी उत्तरेत जाट पंडित होऊन गेलेले पंडित निश्‍चल दास यांची भेट घेतली. त्यांनी प्राकृत ग्रंथ रचले. त्यात त्यांनी वेदांताच्या प्रक्रिया सोप्या करून सांगितल्या. त्या प्रक्रिया आधी समजून घ्यायच्या आणि शिकायच्या. त्याला अनुरूप असा अभंग घ्यायचा. त्याच्या चौकटीत त्याचा अर्थ लावायचा. सुरुवातीच्या काळात जोग महाराजांनी नाना महाराज साखरे यांच्याकडे त्यांनी ज्ञानेश्‍वरीचं श्रवण केलं होतं. मग, त्यांच्या लक्षात आलं की, हे योग्य वाटत नाही. यातून ज्ञानेश्‍वर महाराजांच्या प्रतिभेला, स्वतंत्रतेला बाधा आणत आहोत, असं त्यांना वाटलं. म्हणून ज्ञानेश्‍वरीचा अर्थ लावताना त्यांनी एक तत्त्वज्ञान मुख्य समजून त्याचा अर्थ लावला. हे आपल्या शिष्यांना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी लोणावळ्यामध्ये शिबिर भरवलं. त्यात त्यांनी सांगितलं की, वेदांतांची साथ सोडून द्या, ज्ञानेश्‍वरीचा स्वतंत्रपणे अर्थ लावा. अर्थात, हे त्यांच्या शिष्यांना मानवलं नाही. त्यामुळे जोग महाराजांच्या अखेरच्या इच्छापत्रातही हेच म्हटलं. अजूनही त्याचा हाच प्रयत्न सुरू आहे. मला हे कसं कळलं तर त्या शिबिरात असणारे चर्‍होलीचे पांडुरंग कुलकर्णी हे मोठे विद्वान मनुष्य होते. ते जोग महाराजांच्या शिबिराला हजर होते. त्यांनी कुठंतरी असं लिहून ठेवलंय की, लोणावळ्याला एक शिबिर झालं. त्यात जोग महाराजांनी असं म्हटलं आहे. जोग महाराजांच्या शिबिरातील शिष्य म्हणजे कोण होते तर महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्या काळात मोठमोठे लोक त्यांच्याबरोबर होते. यामध्ये सगळ्यात तरुण होते ते म्हणजे प्रा. शंकर दांडेकर. ते विद्यार्थिदशेपासून जोग महाराजांची व्याख्यानं ऐकायला यायचे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध कादंबरीकार नारायण सीताराम फडके; ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं होतं. तेही अगोदर जोग महाराजांचे शिष्य होते. ते जोग महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवायचे, प्रवचन करायचे. नंतर त्यांचाही मार्ग बदलला. ते दारूबंदीचे कट्टर प्रचारक होते. लोकांनी दारू पिऊ नये म्हणून प्रभात फेर्‍या करायचे. त्यांच्यासोबत अनेक जण दारूबंदीवर जनजागृती करायचे. ही सर्व मंडळी एका प्रवाहातले होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. पहिली दारूबंदीची चळवळ लोकमान्य टिळकांनी राबवली. टिळक लोकांना विनंती करायचे की, दारू पिऊ नका. टिळक दारू पिणार्‍यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करायचे. पोलिस त्या लोकांना पकडायचे. मग, त्यांना पकडल्यावर न्यायालयात उभे केले जायचे. जामीन मिळण्यासाठी लोकांना पैसे लागायचे. म्हणून लोकमान्य टिळकांचा कारकून पैशांची थैली घेऊन न्यायालयाच्या दारात बसायचा आणि पैसे देऊन त्या लोकांना जामीन मिळवून दिला जायचा. तर सांगायचं असं की, जोग महाराज हे लोकमान्य टिळकांबरोबर काम करायचे. ज्या वेळेला टिळक इंग्लंडला निघाले स्वराज्याची खटपट करण्यासाठी, तर त्यांना निरोप देण्यासाठी पुणेकरांनी एक मोठी मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीत जोग महाराजांनी टिळकांना आपल्या खांद्यावर बसवलं होतं. जोग महाराज पैलवान होते. वस्ताद होते. पुण्यातल्या एका महत्त्वाच्या तालमीचे ते वस्ताद होते. त्या वेळेला टिळकांना निरोप देताना त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग पुढे ठेवून एक अभंग रचला. तुकोबांचा तो अभंग म्हणजे…

पुण्य उभे राहो आता, संतांच्या या दर्शने

पंढरीचे लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल…

जोग महाराजांनी तो अभंग असा लिहिला…

पुण्य उभे राहो आता, संतांच्या या दर्शने

विलायतेच्या लागा वाटे, तुम्हाला भेटे स्वराज्य…

अशा प्रकारचा अभंग रचून जोग महाराजांनी टिळकांना शुभेच्छा दिल्या.

तेव्हा वारकरी शिक्षण संस्था स्थापन झालेली नव्हती. ती नंतर अस्तित्वात आली. तोपर्यंत टिळक हेही विलायतेतून परत आले. टिळक भारतात आल्यावरही जोग महाराजांनी आपलं काम सुरू ठेवलं. त्यांनी पंढरपूरला एक प्रदर्शन भरवलं. टिळकांचा मुख्य मुद्दा होता की, परदेशी मालावर बहिष्कार. केवळ परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यापेक्षा त्या वस्तू आपणही बनविल्या पाहिजेत, त्यावर आपण पर्याय दिला पाहिजे. तो पर्याय देण्यासाठी स्वदेशी मालाला उत्तेजन देत जोग महाराजांनी स्वदेशीचं प्रदर्शन वारीदरम्यान पंढरपुरात भरवलं होतं. त्याचं उद्घाटन टिळकांनी केलं. तिथं टिळकांनी भाषण केलं की, जोग महाराजांसारखी माणसं पुढे आली तर स्वराज्य आपण लवकर मिळवू शकू…’

तर जोग महाराज टिळकांना म्हणाले, तुम्ही वारकर्‍यांपुढे कीर्तन करा.’

टिळक म्हणाले, मी करीन; पण मला थोडी तयारी करावी लागेल.’

तर म्हणायचं असं आहे की, टिळक आणि जोग महाराजांचे संबंध खूप चांगले होते. त्यांचे हेच संबंध दा. न. शिखरे यांनी गेली आठ वर्षं या आपल्या नाटकामध्ये व्यवस्थितपणे मांडलेले आहेत.

तर वारी कुठली तर पंढरीची वारी. वारीला आतापर्यंत अनेकांनी इतकं व्यापक केलं आहे. टिळक जेव्हा इंग्लंडला निघाले तेव्हा लोकांमध्ये खूप चैतन्य सळसळलं. ते स्वराज्य घेऊन येतील, असं लोकांना वाटलं. खरोखरच ब्रिटिश सरकारला स्वराज्य परत द्यावं लागलं. टिळकांनी इंग्लंडला जाऊन स्वराज्यासाठी सभा घेतल्या, जागृती केली, लोकांना भेटले. ते इंग्लंडला जाताना त्यांना जोग महाराजांनी निरोप दिला आणि आणखी काही लोकांनी दिला. त्या वेळेस बलवंत नाटक कंपनी नावाची नाटक कंपनी निघाली होती. ती राम गणेश गडकरींची नाटकं करायची. गडकरी तेव्हा मुंबईत मुक्कामाला थांबायचे. त्यांचा मुंबईला एकदा मुक्काम पडला होता. त्यांनी नाटक लिहून दिलं आणि इकडं नाटक बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या नाटकात चिंतामणराव कोल्हटकर होते, दीनानाथ मंगेशकर होते. असे मोठे लोक त्या प्रक्रियेत होते. हे सर्व होतकरू नट होते. त्यांनी नवीन संस्था स्थापन केली होती. एका बंगल्यात सर्वांचा मुक्काम होता. ते सर्वजण सकाळी उठून क्रिकेट खेळायचे. पी. विठ्ठल आणि पी. बाळू हे त्या वेळचे मोठे क्रिकेटपटू होते. पी. विठ्ठल हे हिंदू संघाचे कॅप्टन झाले. पहिल्यांदा त्यांनी हिंदू संघाला विजय मिळवून दिला. त्या वेळी मुस्लिम, पारशी, ब्रिटिशांची टीम असायची. पी. विठ्ठल यांचे मोठे भाऊ म्हणजे पी. बाळू. ते खालच्या जातीतले असल्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती. पी. बाळू सामन्यांमध्ये उत्तम गोलंदाजी करायचे. एका कार्यक्रमात पी. बाळू यांचा टिळकांनी सत्कार केला. त्या वेळेला बातमी आली की, लोकमान्य टिळक इंग्लंडला निघालेले आहेत. मग, सर्वांनी ठरवलं की, टिळकांसाठी काहीतरी करायचं. त्या वेळी चिंतामणराव कोल्हटकरांनी राम गणेश गडकरी यांना फिरायला नेलं. हे दोघे जलाशयाच्या इथं बसले. टिळक इंग्लंडला चाललेले आहेत, त्यांना निरोप देणारी कविता लागेल. गडकरींना वाटलं की, कवीला कोणी सांगू शकत नाही की, कविता अशी लिहायची म्हणून… त्याही परिस्थितीत गडकरी यांनी टिळकांना निरोप देण्यासाठी कविता लिहिली आणि लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले. म्हणजे, एकीकडे गडकरी सांगताहेत टिळकांना, इथं जोग महाराज सांगताहेत की, संतांचं पुण्य तुमच्या मागं उभं आहे. ‘आता तुम्ही विलायतेच्या लागा वाटे भेटे स्वराज्य…’ ही एक स्वराज्याची वारी थेट इंग्लंडपर्यंत लोकमान्य टिळकांच्या काळात जाऊ लागली.

डॉ. सदानंद मोरे 

(लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष  आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Back to top button