'पंढरीसी जावे ऐसी माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !!
संपता सोहळा ना आवडे मनाला लागला टिळा पंढरीचा !!'
या अभंगाच्या अर्थाप्रमाणे पालखी सोहळा प्रत्येक वर्षी पांडुरंगाच्या भेटीला जात असतो. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पायी वारी रद्द झाल्यानेे सर्वत्र भकास वाटत आहे. वारी नसल्यामुळे जीव अगदी कासावीस झाला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये ह.भ.प. राजेंद्र शिंदे महाराज दिंडी क्रमांक 26 रथामागे आमची दिंडी आहे. माझे आजोबा ज्ञानेश्वर कोंडिबा शिंदे यांनी संपूर्ण आयुष्य माऊली पालखी सोहळ्यामध्ये घालविले. त्यांची प्रेरणा घेऊन 1998 साली मला वारीची ओढ लागली. परंतु; आमचे मित्र बबन क्षीरसागर यांच्या सान्निध्याने वयाच्या 28व्या वर्षी म्हणजे 2000 साली मी पहिली पायी वारी पूर्ण केली. सुरुवातीला वारीबाबत माहिती नव्हती. वारीत पायी चालताना सर्व सुख-दुःखांचा विसर पडत गेला. नामस्मरण करीत असताना जणू काही पांडुरंग व माऊली आपल्यासोबत असल्याचे जाणवत होते. नामस्मरण व भजनाचा आनंद घेत वारी कशी पूर्ण झाली ते मला कळलेच नाही. वारी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मला पांडुरंगाचे दर्शन झाले, तेव्हा विश्वाचा मालक साक्षात पांडुरंग आपल्या संगतीत असल्याचे समाधान मिळाले आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले, असे वाटले. तेव्हा वीज वितरण कंपनीमध्ये काम करीत असतानासुद्धा पांडुरंगाच्या पायी वारीमधून ओढ लागलेल्या दर्शनामुळे 2000 ते 2019 पर्यंत 20 वर्षे अखंडपणे पायी वारी सुरू आहे.
त्यामुळे पंढरीची वारी म्हणजे माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. वारीतील वारकरी संप्रदायामधून धार्मिक ज्ञानाबरोबर आपल्या जीवनात आचरण कसे असावे, हे समजले. वारीमधून स्वतःला मानसिक समाधान तर मिळालेच; पण चांगले विचार, आचार यांची स्फूर्ती आपोआप मिळत गेली. आपल्या आयुष्यात येणार्या प्रत्येक संकटांना सात्त्विक मार्गाने सामोरे जाण्याची सकारात्मकता निर्माण झाली. त्याचबरोबर जीवन सफल होऊन जन्माची कर्तव्ये पूर्ण होऊन चांगले जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण झाली.
मात्र, गेल्या दोन आषाढी वार्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात साजर्या होत आहेत. त्यामुळे भंडीशेगाव येथे पालख्यांचे स्वागत व सेवा करण्याची संधी मिळणार नाही. वाडीकुरोली येथील टप्पा येथे माऊली व संत सोपानदेव यांच्या भेटीलाही मुकावे लागणार आहे, याची मनात हुरहुर लागली आहे.
जो आनंद वारीत आहे, तो जीवनात कशातच नाही. आता आषाढी वारी दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर जगावरचे कोरोनाचे संकट दूर होवो, सर्व जनता व शेतकरीवर्ग सुखी, समाधानी राहू दे, अशी संकटे पुन्हा येऊ देऊ नको आणि पायी पालखी सोहळा लवकरात लवकर सुरू होऊन वारी घडू दे, असे साकडे विठ्ठलाला घालणार आहे.
राजेंद्र (गणपत) मार्तंड शिंदे भाळवणी, ता. पंढरपूर
ज्ञानेश्वर माऊली पाळखी सोहळा रथाच्या पाठीमागे दिंडी क्र. 26
शब्दांकन ः नितीन शिंदे , भाळवणी