Google : गुगल सर्चमधील वैयक्तिक माहिती आता हटविता येणार | पुढारी

Google : गुगल सर्चमधील वैयक्तिक माहिती आता हटविता येणार

माऊंटेन व्यू  वृत्तसंस्था : इंटरनेटवर वावरताना तुमचे नाव, फोन क्रमांक, ई-मेल, घरचा पत्ता अशी वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याच्या द़ृष्टीने ‘गुगल’ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे तुम्हाला अशी माहिती आता ऑनलाईन सर्चपासून सुरक्षित ठेवता येणार आहे, म्हणजेच ती गुगल सर्चवरून हटविता येणार आहे. (Google)

गुगलने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनीने आपले नवे धोरण लागू केले आहे. त्या अंतर्गत युझर्स संबंधित सुविधेचा वापर करून आपली वैयक्तिक माहिती हटविण्याची विनंती ‘गुगल’ला करू शकतात. त्यानुसार सर्च

रिझल्टमध्ये दिसणारी युझर्सची माहिती हटविण्यात येईल. दरम्यान, युझर्ससाठी संवेदनशील मानली जाणारी गोपनीय लॉग-इन क्रेडेंशिअलसारखी अन्य माहितीही हटविता येणार आहे.

गुगलने यापूर्वी युझर्सना बँक खात्याचा तपशील, तसेच क्रेडिट कार्ड क्रमांक अशी ऑनलाईन फ्रॉडच्यादृष्टीने संवेदनशील मानली जाणारी माहिती आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटविण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.

माहिती हटविण्यासाठी हे करा…

गुगल सर्च रिझल्टमध्ये जर का तुम्हाला तुमचा फोन / मोबाईल नंबर, ई-मेल, पत्ता, नाव अशी माहिती दिसून येत असेल आणि ती हटवायची असेल, तर त्यासाठी गुगलच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागेल. ई-मेलद्वारेही तुम्ही संबंधित माहिती हटविण्याची विनंती करू शकता. अशी विनंती प्राप्त झाल्यानंतर कंपनीकडून आपल्या वेब पेजवर त्याची पडताळणी करून ही माहिती हटविली जाईल. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, तुमची माहिती गुगल वगळता इतर प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असू शकते, हेही युझर्सने इथे लक्षात घ्यावे.

हेही वाचा

Back to top button