देशभर उष्णतेची लाट : पाच राज्यांत ऑरेंज अलर्ट; विदर्भात तापमान ४५.८अंशांवर | पुढारी

देशभर उष्णतेची लाट : पाच राज्यांत ऑरेंज अलर्ट; विदर्भात तापमान ४५.८अंशांवर

नवी दिल्ली/ मुंबई/ चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा देशाच्या काही भागात उष्णतेची लाट उसळल्याने तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आणखी पाच दिवस अनेक राज्यांत उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाची राजधानी दिल्लीबरोबरच राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर भारतात बहुतांश राज्यातील तापमान सरासरीच्या तुलनेत 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. एकीकडे उत्तर-पश्चिम भारतात उन्हाळ्याचा तडाखा वाढणार आहे तर दुसरीकडे ईशान्य भारतात विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 1 आणि 2 मे रोजी राजस्थानमध्ये पारा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. याशिवाय विदर्भातील काही भाग, पश्चिम-उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, झारखंड, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि गुजरात याठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

चंद्रपुरात सर्वाधिक 45.8 अंशाची नोंद 

यंदाही विदर्भासह महाराष्ट्रात पार्‍याने चाळीशीच्या पुढे उच्चांकी उसळी मारल्याने प्रचंड उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत उष्माघाताने बळी जात आहेत. भरदिवसाही रस्ते निर्मनुष्य होत आहेत. गुरुवारी चंद्रपूरचे तापमान 45.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेल्याने ते देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले.

30 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये तर तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील जनतेला पुढील किमान आठवडाभर उन्हाच्या झळांपासून स्वत:चे संरक्षण करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे. सातत्याने पारा वाढतच आहे. काही वेळ अंशत: ढगाळ वातावरण राहिले तरीही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

गुरुवारी चंद्रपूरपाठोपाठ अकोला 45.4, ब्रह्मपुरी 45.2, वर्ध्याचे 45.1 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान सध्या 42 अंशांवर नोंदविण्यात येत आहे.

जीवाची काहिली, रस्ते ओस 

यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोंदिया, वाशिम, बुलडाणा आणि गडचिरोलीतही तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात सातत्याने विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. एरव्ही मे महिन्यात नोंद होणारे 45 अंशांचे तापमान एप्रिल महिन्यातच नोंद झाल्याने चिंताही व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानाने जीवाची काहिली होत असून सगळेच हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते ओस पडत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button