'सुपर बाईक' घेण्यासाठी तरुणाने पोतं भरून आणली १ रुपयांची नाणी; मोजायला लागले तब्‍बल १० तास | पुढारी

'सुपर बाईक' घेण्यासाठी तरुणाने पोतं भरून आणली १ रुपयांची नाणी; मोजायला लागले तब्‍बल १० तास

पुढारी ऑनलाईन ; असं म्‍हणतात स्‍वप्नपूर्तीसाठी लोकं प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करतात. मात्र तामिळनाडूमधील एका बिलंदर युवकाने स्‍वप्‍नातील सुपरबाईक घेण्‍यासाठी चक्‍क पोत्‍यातून रुपयांची नाणी  शोरूममध्ये आणली. त्‍याने दाखवलेल्‍या राेकड पाहून शाेरुममधील कर्मचाऱ्यांना धक्‍काच बसला. तरुणाने सुपरबाईक खरेदीसाठी ज्या पद्धतीने पेमेंट केले, हा विषय साेशल मीडियावर सध्‍या चर्चेचा विषय ठरला.

त्‍याच असं झालं की, तामिळनाडूतील सेलम येथे राहणाऱ्या बीसीएचा विद्यार्थी व्ही भूपती याने चार वर्षांपूर्वी आपल्या सुपरबाईक खरेदी करण्याचे स्‍वप्‍न पाहिलं. त्यावेळी त्याच्याकडे ते विकत घेण्यासाठी पैसे नव्हते; मग बाईक विकत घेण्यासाठी पैसे जोडायचे त्याने ठरवले. आपलं स्‍वप्‍न वास्‍तवात उतरवण्‍यासाठी त्‍याने तब्‍बल तीन वर्ष दररोज एक-एक रूपयांची नाणी जमा केली. तब्‍बल २.६ लाख रुपयांची बचत केली. आता स्‍वप्‍न वास्‍तवात उतरवण्‍याची वेळ आली.

सर्व कर्मचारी हैराण झाले…अन् पैसे मोजता-मोजता घाम फुटला

२ लाख रुपयांची नाणी पोत्‍यात भरून व्ही भूपती बाईक खरेदीसाठी शोरूममध्ये पोहोचला. त्‍याने सोबत आणलेली पोती उघडली तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांसह वाहन खरेदीसाठी आलेले लोकही अवाक झाले. भारत एजन्सीचे व्यवस्थापक महाविक्रांत यांनी सांगितले की, मोटरसायकल शोरूमच्या कर्मचाऱ्यांना भूपतीच्या तीन वर्षांच्या बचतीची मोजणी करण्यासाठी तब्‍बल 10 तास लागले.

असे म्‍हणतात की, एखादी गोष्‍ट मनापासून हवी असेल आणि तुम्‍ही प्रामाणिक प्रयत्‍न केले तर  ती गोष्‍ट तुम्‍हाला मिळतेच. बाईक, कार किंवा आणखी काही असो सगळेच खरेदी करतात, मात्र भूपतीने ज्‍या पध्दतीने आपल्‍या स्‍वप्नासाठी दररोज एक-एक रुपया साठवला अन् बाईक खरेदीसाठी भूपतीने बचत केलेला पैसे हाच चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button