नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युद्धाची व्याप्ती वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी भडकले आहेत. ब्रेंट क्रूडचे प्रती बॅरलचे दर आता ११७ डॉलर्सवर गेले असून याच्या परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आगामी काळात पेट्रोलचे दर लीटरमागे तीस रुपयांनी वाढविले जाऊ शकतात. (Petrol Diesel rate)
इंधन दरवाढीचा फटका बसू नये, यासाठी अनेक देशांनी त्यांच्या स्ट्रेटेजिक ऑईल रिझर्व्हचा (धोरणात्मक तेलसाठा) आसरा घेतला आहे.
२ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक बाजारात क्रूड तेलाचे प्रती बॅरलचे दर ७० डॉलर्सच्या आसपास होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हे दर ११७ डॉलर्सच्या स्तरावर गेले आहेत.
क्रूड तेलाच्या दरात झालेली ही वाढ ५७ टक्क्यांची आहे. अर्थातच क्रूड तेलाचे दर भडकल्याने अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी एक्साईज कर कमी केला होता. (Petrol Diesel rate)
त्यापाठोपाठ अनेक राज्य सरकारांनी देखील आपले कर कमी करत नागरिकांना दिलासा दिला होता. तथापि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यावर नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.