Sanjay Raut : …तर ऑपरेशनला ‘सह्याद्री’ नांव दिलं असतं ! संजय राऊत यांचा खोचक टोला | पुढारी

Sanjay Raut : ...तर ऑपरेशनला 'सह्याद्री' नांव दिलं असतं ! संजय राऊत यांचा खोचक टोला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युक्रेनवरील रशियाच्या सैन्य कारवाईमुळे अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन गंगावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणताना त्याची जाहिरातबाजी कशाला? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार) केंद्र सरकारवर निशाणा साधला.

केवळ उत्तर प्रदेशात निवडणुका असल्याने ऑपरेशन ‘गंगा’ सुरू आहे. पंजाबमध्ये निवडणुका झाल्या आहेत. परंतु, सध्यस्थितीत तिथे निवडणुका असत्या तर ऑपरेशनला अमृतसरमधील धार्मिकस्थळाचे नाव दिले असते. महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ऑपरेशनला ‘सह्याद्री’ नाव दिले असते, गुजरातमध्ये तर ‘ऑपरेशन सोमनाथ’ नावाने ही मोहीम राबवली असती, असा टोला राऊत यांनी लगावला. सरकारने राजकारण आणि प्रपोगंडा बाजूला ठेवून परिस्थतीचे भांडवल करू नये, असा सल्ला राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिला.

शंभर दीडशे मुलांना आणून ऑपरेशन गंगा अशी जाहिरात केली जात आहे. पंरतु, हे निवडणुकीचे राजकारण बंद केले पाहिजे. देशाची मुलं संकटात असताना निवडणुका, प्रचार आणि प्रसार दिसत असेल, तर त्याला ‘राष्ट्रीय बाणा’ म्हणत नाहीत, अशी टीका राऊत यांनी (Sanjay Raut) केली.

संभाजीराजेंनी टोकाची भूमिका घेऊ नये

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका सकारात्मक आहे. छत्रपती आमचेही आहेत. जास्त आमचेच आहेत. त्यांच्याशी आमचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. चर्चेतून त्यांनीच मार्ग दिला पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ

बौद्ध धर्मातील तीन पंथांसह दात्यांचे शिल्प, औरंगाबाद (राजताडगा) लेणीचे वेगळेपण

Back to top button