

रायपूर; वृत्तसंस्था : दंतेवाडा-विजापूर सीमेवरील भैरमगड परिसरातील केशकुतुलच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये 12 नक्षलवादी ठार झाले असून 3 जवान शहीद झाले. कोब्रा बटालियनचे संयुक्त पथक पश्चिम बस्तर डिव्हिजनच्या दिशेने शोध मोहिमेवर निघाले होते. दरम्यान, 3 डिसेंबर रोजी तिथे आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही तातडीने प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले आहे.
दोन्ही बाजूंनी गोळीबार अव्याहतपणे सुरू असून, त्यामुळे मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही चकमक नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांच्या सुरू असलेल्या सलग कारवाईचाच एक भाग आहे. जिल्ह्यात नुकत्याच काही काळात अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून कारवाई सुरू ठेवली आहे आणि परिसरातील गावकर्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.