Rahul Bajaj : ‘गति’मान उद्योजक : राहुल बजाज | पुढारी

Rahul Bajaj : ‘गति’मान उद्योजक : राहुल बजाज

उद्योग क्षेत्रातील भीष्माचार्य, द्रष्टे आणि परखड व्यक्तिमत्त्व म्हणून राहुल बजाज (Rahul Bajaj) यांना ओळखले जात होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांचे ते सुपुत्र. राहुल यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली आणि दुचाकी विकणारी ती देशातील आघाडीची कंपनी बनली. ते बजाज समूहाचे 50 वर्षे अध्यक्ष होते. 2005 नंतर त्यांनी कंपनीची सूत्रे मुलगा राजीव यांच्याकडे सोपविण्यास सुरुवात केली. मागील वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी वयाचा विचार करून बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते चेअरमन एमिरेट्स म्हणून सध्या कार्यरत होते.

राहुल यांचे आजोबा जमनालाल बजाज (1889-1942 ) हे बजाज ऑटोचे संस्थापक. राहुल बजाज यांनी 1958 मध्ये नवी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रातील बी. ए. ही पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवीही प्राप्त केली. त्यांनतर ते अमेरिकेत हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी गेले. ही पदवी मिळाल्यानंतर ते 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले.

कंपनीतील मार्केटिंग, अकाऊंट्स, खरेदी आणि ऑडिट यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळत होते. बजाज ऑटोचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवल के. फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. नंतर फिरोदिया आणि बजाज वेगळे झाले.

राहुल बजाज यांनी 1970 आणि 80च्या दशकात ही कंपनी स्थापन केली. त्यांच्या पुढाकारानेच चेतक आणि बजाज सुपर मॉडेल भारतीय बाजारपेठेत नावारूपास आले. ‘हमारा बजाज’ म्हणून त्याची ओळख कायम राहिली. प्रभावी विपणन आणि मार्केटिंगच्या साहाय्याने त्यांनी कंपनीची वाटचाल प्रगतिपथावर ठेवली. (Rahul Bajaj)

2008 मध्ये त्यांनी बजाज ऑटोचे बजाज ऑटो, फायनान्स कंपनी बजाज फिनसर्व्ह आणि एक होल्डिंग कंपनी या तीन युनिट्समध्ये विभाजन केले.

राहुल बजाज यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम पहिले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. 1986 मध्ये त्यांची इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जून 2006-2010 या काळात ते राज्यसभेवर होते. 2013 मध्ये बजाज परिवाराने ‘डिस्टिंग्विश्ड फॅमिली ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला.

लोकहितासाठी त्यांची संपत्ती आणि वेळ समर्पित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानदेखील प्रदान करण्यात आला आहे. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.

Koo App

यशस्वी उद्योजक, समाजसेवी और बजाज के पूर्व चेयरमैन राहुल बजाज जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। पद्म भूषण से सम्मानित राहुल जी से मेरे अनेक वर्षों से व्यक्तिगत संबंध रहे हैं। विगत पॉंच दशकों से बजाज ग्रुप का नेतृत्व करने वाले राहुल जी का उद्योग जगत में महत्वपूर्ण योगदान रहा है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे। ॐ शांति

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 12 Feb 2022

Back to top button